पुणे जिल्हा | रास्ता रोकोनंतर वनविभाग ताळ्यावर जांबूतमध्ये मादी बिबट्या जेरबंद

जांबूत, (वार्ताहर)- जांबूत (ता. शिरूर) येथील दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात मुक्ताबाई खाडे या महिलेच्या मृत्यू झाला. संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाविरोधात रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर मात्र वनविभाग खडबडून जागा झाला.
यावेळी वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात घटनास्थळापासून तीनशे फूट अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (दि.२८) पहाटे एका चार वर्षीय मादी संवर्गातील बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याची रवानगी थेट माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात करण्यात आली आहे, अशी माहिती वनकर्मचारी महेंद्र दाते यांनी दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरात एकूण दहा पिंजरे लावण्यात आले असून बिबट्या प्रवणक्षेत्र असलेल्या भागात पिंजऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी सांगितले.
मात्र, परिसरातील सगळे बिबटे पंधरा दिवसांत जेरबंद करण्याचा अल्टीमेटम ग्रामस्थांनी वनप्रशासनाला केला असल्याने नागरिकांमध्ये घटनांचा संताप अद्यापही पाहायला मिळत आहे.
ज्या भागात बिबट्यांचा मोठा वावर दिसून येतो. त्या, त्या ठिकाणी वनविभागाने पहारा देणे गरजेचे आहे. वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरे बसविण्यात यावेत, ड्रोनद्वारे टेहाळणी करून लवकरच सर्व बिबट्यांना जेरबंद करा, अशी मागणी आता जोर धरू लागली असल्याने वनविभागापुढे मोठे आव्हान गावकऱ्यांनी उभे केले आहे.





