काबुल : अफगाणिस्तानवर तालिबान बंडखोरांनी पूर्णपणे कब्जा केला आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सत्ता हस्तांतराबाबत चर्चा करण्यासाठी तालिबानचे मध्यस्थ रविवारी अध्यक्षीय राजवाड्यात पोहोचले. सरकारच्या बाजूने माजी अध्यक्ष हमीद करझई आणि अफगाण राष्ट्रीय सलोखा परिषदेचे प्रमुख अब्दुल्ला वाटाघाटी करणार आहेत. या धुमश्चक्रीवेळी जागतिक स्तरावरून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. आता मात्र अगदी गल्लीपासून अमेरिकेपर्यंत अनेकविध देश आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यातच भारतातील नेत्यांनीही यावर मते मांडण्यास सुरुवात केली असून, काहींनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकावर टीकास्त्र सोडले असून, सन २०१३ मध्ये संसदेत केलेल्या एका भाषणाची आठवण करून दिली आहे. ते म्हणाले,’भारत सरकारने तालिबानशी राजकीय स्तरावर अफगाणिस्तानातील आपल्या हितांच्या रक्षणासाठी संवाद सुरू केला पाहिजे. यापूर्वी भारताने ३ अब्ज डॉलरची अफगाणिस्तानात गुंतवणूक केली होती. कोणत्याही सरकारने या बाजूकडे लक्ष दिलेले नाही. आता यावर भारत सरकार काय करणार, अशी विचारणा ओवेसी यांनी केली आहे.”अफगाणिस्तानसंदर्भात भारताची भूमिका काय हे अद्यापही स्पष्ट नाही, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.