अफगाणी परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी यांची जयशंकर यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर आलेले अफगाणिस्तानचे प्रभारी परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी यांनी शुक्रवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या अनुषंगाने चर्चा केली. अफगाणिस्तानमधील उच्चाधिकारी लवकरच भारतात नियुक्त केले जातील असे मुत्तकी यांनी जयशंकर यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर सांगितले. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर अन्य कोणत्याही देशाविरोधात केला जाऊ दिला जाणार नाही, असेही मुत्तकी यांनी यावेळी सांगितले.
सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी मुत्तकी गुरुवारी भारतात आले आहेत. चार वर्षांपुर्वी अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने ताब्यात घेतल्यापासून भारत दौऱ्यावर आलेले ते अफगाणिस्तानचे पहिलेच वरिष्ठ मंत्री आहेत. भारताने अद्याप अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीला मान्यता दिलेली नाही. जयशंकर यांच्याबरोबर व्यापक चर्चा केल्यानंतर यांनी पत्रकारांच्या गटाबरोबर वार्तालाप देखील केला.
भारतीय उद्योजकांनी अफगाणिस्तानमधील खाण, खनिज आणि उर्जा क्षेत्रात मध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहनही त्यांनी केले. इराणमधील चाबहार बंदर विकसित करण्यामधील अडथळे दोन्ही देशांनी मिळून दूर करण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांबद्दलही मुत्तकी यांनी समाधान व्यक्त केले. मुत्तकी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील दारुल उलूम देवबंद इस्लामिक सेमिनरीला भेट दिली. मदरसा प्रशासनाने त्यांच्या स्वागतासाठी विस्तृत व्यवस्था केली होती. मुत्तकी यांच्या स्वागतासाठी १५ प्रमुख उलेमांची यादी देण्यात आली होती. दारुल उलूममधील स्वागत समारंभाचे आयोजन मदरशाचे रेक्टर मौलाना मुफ्ती अबुल कासिम नोमानी यांनी केले होते.
पत्रकार परिषदेला पत्रकार महिला अनुपस्थित
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी संबोधित केलेल्या पत्रकार परिषदेत काही मोजक्या पत्रकारांचा सहभाग होता. महिला पत्रकारांची अनुपस्थिती लक्षात येण्यासारखी होती. पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करण्याचा निर्णय परराष्ट्रमंत्र्यांसोबत असलेल्या तालिबानी अधिकाऱ्यांनी घेतल्याचे कळते. अफगाणिस्तानच्या बाजूने महिला पत्रकारांना या कार्यक्रमासाठी निमंत्रितांमध्ये समाविष्ट करावे असे भारतीय बाजूने सुचवले होते.
अफगाणिस्तानातील महिलांच्या हक्कांवर बंधने घातल्याबद्दल तालिबान राजवटीला विविध देशांकडून तसेच संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक संस्थांकडून तीव्र टीका केली जात आहे. मुत्तकी यांना अफगाणिस्तानातील महिलांच्या दुर्दशेबद्दल थेट प्रश्न विचारला असता प्रत्येक देशाचे स्वतःचे रीतिरिवाज, कायदे आणि तत्त्वे आहेत आणि त्यांचा आदर केला पाहिजे, असे ते म्हणाले.





