AFG vs NZ : बीसीसीआयचा पुन्हा एकदा अफगाणिस्तानला मदतीचा हात, ग्रेटर नोएडासह ‘या’ दोन शहरातील….

Afghanistan Cricket & BCCI : अफगाणिस्तान क्रिकेट संघाला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) मदत करण्यास पुढे आले आहे. आता अफगाणिस्तानचा संघ सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह पथिक कॉम्प्लेक्समध्ये खेळवला जाईल. बीसीसीआयने ग्रेटर नोएडा, कानपूर आणि लखनौ येथील मैदाने ही अफगाणिस्तान संघाचे होम ग्राउंड म्हणून घोषित केल्याची बातमी समोर आली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट सुरू झाली तेव्हा बीसीसीआय अफगाण संघाला पाठिंबा देणारे पहिले क्रिकेट बोर्ड होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच अफगाणिस्तान संघासाठी ग्रेटर नोएडा, कानपूर आणि लखनौ येथील मैदाने अफगाणिस्तान संघाला घरचे मैदान (होम ग्राउंड) म्हणून देण्याची घोषणा करू शकते. तालिबान राजवट सुरू झाल्यानंतर चार वर्षांनी अखेर बीसीसीआयने अफगाणिस्तानचे सामने भारतात आयोजित करण्यास परवानगी दिली आहे.
ऑस्ट्रेलियाने तीन वेळा खेळण्यास दिला आहे नकार…
तालिबान सरकार आल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्ध तीनदा खेळण्यास नकार दिला आहे. महिलांना खेळात सहभागी होण्यापासून रोखणाऱ्या तालिबानच्या धोरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने हे केले आहे. पण ऑस्ट्रेलियाचा शेजारी देश न्यूझीलंडने हा मुद्दा तूर्तास बाजूला ठेवून अफगाणिस्तानशी खेळण्यास होकार दिला आहे.
दरम्यान, याआधी अफगाणिस्तानचा संघ बांगलादेशविरुद्ध मालिका खेळणार होता, जी भारतात आयोजित केली जाणार होती. मात्र त्यावेळी उत्तर भारतात तीव्र उष्णतेमुळे ती मालिका पुढे ढकलण्यात आली होती. या दौऱ्यात अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात 2 कसोटी सामने आणि इतर पांढऱ्या चेंडूचे सामने खेळवले जाणार होते.





