IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका चौथा टी-२० सामना रद्द! आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पहिल्यांदाच असं घडलं

IND vs SA 4th T20I match abandoned : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना बुधवारी लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार होता. मात्र, मैदानावर पसरलेल्या दाट धुक्यामुळे हा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंचांना घ्यावा लागला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पावसाशिवाय केवळ धुक्यामुळे सामना रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पंचांनी पाच वेळा केले मैदानाचे निरीक्षण –
सामन्याची वेळ संध्याकाळी ७:०० वाजताची होती आणि नाणेफेक ६:३० वाजता होणार होती. मात्र, धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी असल्याने पंचांनी ६:५० वाजता पहिले निरीक्षण केले. त्यानंतर रात्री ७:३०, ८:००, ८:३०, आणि ९:०० वाजता सलग चार वेळा पाहणी करण्यात आली. तरीही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर रात्री ९:२५ वाजता पाचव्यांदा मैदानाची पाहणी केल्यावर, खेळ होणे अशक्य असल्याचे सांगत पंचांनी सामना अधिकृतपणे रद्द घोषित केला.
प्रदूषणाचाही मोठा फटका –
𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞: The fourth India-South Africa T20I is called off due to excessive fog.#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/QWDUVFxVlP
— BCCI (@BCCI) December 17, 2025
केवळ धुकेच नाही, तर लखनऊमधील हवेची खालावलेली गुणवत्ता (AQI) देखील चिंतेचा विषय ठरली आहे. सध्या लखनऊचा ‘AQI’ ४०० च्या वर पोहोचला असून ही पातळी आरोग्यासाठी अतिशय धोकादायक मानली जाते. मैदानावर सराव करताना आणि डगआऊटमध्ये बसलेले असताना टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्यासह अनेक खेळाडू मास्क घातलेले दिसून आले. खेळाडूंच्या आरोग्याचा विचार करता हा सामना रद्द करणे योग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पुढील सामना अहमदाबादमध्ये –
लखनऊमध्ये गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी आणि धुक्याचे प्रमाण वाढले आहे. या हवामानाचा फटका मालिकेतील महत्त्वाच्या सामन्याला बसला. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमधील मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना १९ डिसेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.





