राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठीची जाहिरात प्रसिद्ध

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) 161 पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ही 21 ऑगस्टला राज्यभरातील 37 केंद्रांवर होणार आहे. एमपीएससीने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठीची जाहिरात बुधवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार वित्त आणि लेखा सेवा गट अ सहायक संचालक, नगरपालिका, नगरपरिषद मुख्याधिकारी गट अ, बालविकास प्रकल्प अधिकारी गट अ, राज्य उत्पादन शुल्क सहायक आयुक्त गट ब, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त गट ब, कक्ष अधिकारी गट ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब आदी पदांसाठी प्रक्रिया राबवण्यात येईल.
पूर्व परीक्षेतील निकालाच्या आधारे जानेवारी 23 मध्ये मुख्य परीक्षा होण्याची शक्यता आहे. या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पदसंख्या आणि आरक्षणामध्ये राज्य शासनाच्या विभागांच्या सुचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. नमूद केलेल्या संवर्गांव्यतिरिक्त नवीन संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित, अतिरिक्त किंवा नवीन संवर्गाच्या मागणीपत्रानुसार उपलब्ध होणारी पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेतली जातील.





