Narhari Zirwal : भेसळखोरांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे अॅक्शनमध्ये असताना आता मंत्री देखील मैदानात, अॅान स्पॅाट केली तपासणी
Narhari Zirwal : मोठ्या प्रमाणावर तक्रारींचा ओघ सुरू असून, या तक्रारींची दखल एफडीएकडून घेतली जात आहे.

Narhari Zirwal : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभर भेसळखोरांविरोधात सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नागरिकांना थेट तक्रार करता यावी यासाठी तुकाराम मुंढे यांनी टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचे तसेच इमेलवरुन देखील तक्रार करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर तक्रारींचा ओघ सुरू असून, या तक्रारींची दखल एफडीएकडून घेतली जात आहे.
एफडीएकडून दूध, पनीर, खवा तसेच सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनांवर कारवाईचा धडाका सुरू असतानाच आता अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्वतः मैदानात उतरून भेसळीविरोधातील मोहिमेला आणखी वेग दिला आहे.
नाशिकमधील प्रसिद्ध दूध बाजार परिसरात मंत्री झिरवाळ यांनी एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अचानक भेट देत विक्रीसाठी आलेल्या दुधाची प्रत्यक्ष तपासणी केली. अचानक मंत्री आल्याने संबंधित ठिकाणी एकच चर्चा सुरू झाली. बाजारातील दूध वाहतूक करणाऱ्या गाड्या, कॅन्स आणि विक्री केंद्रांची पाहणी झिरवाळ यांनी करत यामध्ये त्रुटी आढळल्यास अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले. यावेळी विविध दुधाचे नमुने घेऊन प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवण्यात आले.
दुधातील वाढती भेसळ रोखणे आणि ग्राहकांना शुद्ध व सुरक्षित दूध उपलब्ध करून देणे हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. मंत्री स्वतः अधिकाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरल्याने या कारवाईची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.
बीडमध्ये मोठी कारवाई
दरम्यान, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात उमरी फाटा येथील ‘विशाल डेअरी’वर एफडीएच्या पथकाने मध्यरात्री धडक छापा टाकला. या कारवाईत तब्बल 6 लाख 68 हजार रुपयांचा भेसळयुक्त व आरोग्यासाठी धोकादायक मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामुळे दूध व मिठाई व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
एफडीएच्या तपासात या डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट आणि निकृष्ट दर्जाचे पेढे तयार केले जात असल्याचे उघड झाले. धक्कादायक बाब म्हणजे हे पेढे केवळ बीडपुरते मर्यादित नसून शेजारील जिल्ह्यांतील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये प्रसादासाठीही पुरवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. भेसळखोरांविरोधातील ही कारवाई पुढील काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा एफडीए प्रशासनाने दिला आहे.





