Top 10 News : बंडखोर खासदारांच्या महाराष्ट्रात परतण्याच्या कार्यक्रमात बदल, खासदारांमागे ठाकरेंचे आमदारही शिंदेंकडे येणारच आणि “हवामान बदलला पुरुष जबाबदार”, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : शिंदेंचे ऑपरेशन टायगर जरी यशस्वी झालं असलं तरी बंडखोर सहा खासदारांच्या संबंधी एक मोठी माहिती समोर येत आहे.

Top 10 News : बंडखोर खासदारांच्या महाराष्ट्रात परतण्याच्या कार्यक्रमात बदल
फुटलेले 4 खासदार राजस्थानमध्येच
Top 10 News : शिंदेंचे ऑपरेशन टायगर जरी यशस्वी झालं असलं तरी बंडखोर सहा खासदारांच्या संबंधी एक मोठी माहिती समोर येत आहे. हे सर्व खासदार आज होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिंदेंच्या मंचावर दिसतील अशी चर्चा सुरू होती. मात्र या खासदारांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त आता बदलण्यात आल्याची माहिती आहे. 21 किंवा 22 जून रोजी हे सर्व खासदार महाराष्ट्रात परत येणार असून त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश केला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय.बंडखोरी केलेल्या या खासदारांचे मतपरिवर्तन होऊ नये यासाठी त्यांना जयपूरच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहे. जयपूरमध्ये सहापैकी चार खासदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर इतर दोन खासदार वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. या सर्व खासदारांना 21 जून किंवा 22 जून रोजी महाराष्ट्रात परत आणण्यात येणार आहे. तोपर्यंत लोकसभेमध्ये त्यांच्या विलिनीकरणाची घोषणा झाली असेल. त्यामुळे त्यांना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही.
खासदारांमागे ठाकरेंचे आमदारही येणारच;
ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंच्या नेत्याचा दावा
शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर आता ठाकरेंच्या आमदारांवरही त्यांचा डोळा असल्याचं दिसतंय. त्याला पुष्टी देणारं वक्तव्य शिंदेंच्या आमदाराकडून करण्यात आलं आहे. ठाकरेंच्या खासदारांपाठोपाठ आाता आमदारही शिंदेंच्या शिवसेनेत येतील, शिंदें साहेबांचं नियोजन एकदम करेक्ट आहे, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं. बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम हे एकनाथ शिंदे यांनी केल्याचं बच्चू कडू म्हणाले. तसेच शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत. या राज्यामध्ये सर्वसामान्य, शेतकरी, गरीबांचा, दिव्यांगांचा खरा माणूस म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. मी जसा त्यांच्या सेवाभावी वृत्तीच्या मोहात पडलो तसे अनेकजण त्यांच्या मोहात आहेत, असंही बच्चू कडू म्हणाले.
‘त्यांच्या’आरोपांना उत्तर द्यायला मी बांधील नाही
नागेश आष्टीकरांच्या मुलाचा सुषमा अंधारेंवर संताप
ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर सध्या ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार टीका केली जातीय. सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर सडकून टीका करत आष्टीकरांच्या मुलाला उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची उमेदवारी दिल्याची आठवण करून दिली.याच मुद्द्यावरून नागेश आष्टीकर यांनी अंधारेंवर टीका केलीय.सुषमा अंधारे यांच्या आरोपांना उत्तर द्यायला मी बांधील नाही. सुषमा अंधारे यांनी तर पार आमच्या खानदानीचा उद्धार केला, हे ऐकून मला खूप वाईट वाटले. वडील एका पक्षात आणि पुत्र दुसऱ्या पक्षात, हे समीकरण काही नवीन नाही. अजून माझे वडील तिकडे गेलेत का, यांना कसली घाई आहे हेच मला कळत नाहीये. सुषमा अंधारे पुण्यात बसून गणित मांडत आहेत. अशा नेत्यांमुळेच त्यांना वीट आला असावा. आमच्यावर व्यक्त होण्याचं काही कारण नव्हतेअसं म्हणत त्यांचा समाचार घेतलाय.
तुकाराम मुंढेंच्या रडारवर आता मुंबईतील व्यापारी;
1,328 किलो भेसळयुक्त मिठाई, मावा जप्त
अन्नातील भेसळीविरोधात राज्यभर कारवाईचा तीव्र धडाका लावलेले अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची वक्रदृष्टी आता मुंबईतील भेसळखोर व्यापाऱ्यांवर पडली आहे. मुंबईत एफडीएच्या पथकाने एक मोठी कारवाई करत तब्बल 1,328 किलो संशयित भेसळयुक्त मिठाई आणि मावा जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे मुंबईतील अस्वच्छ आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. एफडीएच्या पथकाने मुंबईतील गिरगाव आणि कुंभारवाडा परिसरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी अचानक छापेमारी करून ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या एकूण मालाची बाजारपेठेतील किंमत 3 लाख 60 हजार 380 रुपये एवढी आहे.दरम्यान, मुंढेंच्या या कारवाईने भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत.
चिकन शाओर्मा, पिझ्झा खाल्ल्याने १४ जणांना विषबाधा
भिवंडीतील घटनेने एकच खळबळ Top 10 News :
भिवंडी शहरातील खांडूपाडा परिसरात चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्याने एकाच कुटुंबातील ६ सदस्यांसह एकूण १४ जणांना अन्नातून विषबाधा (फूड पॉयझनिंग) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.बाधित रुग्णांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागल्याने, त्यांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. संबंधित नागरिकांनी खांडूपाडा परिसरातील ‘फेमस शोरमा’ नावाच्या दुकानातून चिकन शाओर्मा आणि पिझ्झा खरेदी करून रात्री घरी नेऊन खाल्ला होता. त्यानंतर काहींना अस्वस्थ वाटू लागले. हा त्रास अधिक वाढल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक अंदाजानुसार ही अन्नातून विषबाधा असल्याचे सांगितले. बाधितांमध्ये ६ पुरुष, ६ महिला आणि २ लहान मुलांचा समावेश आहे.
‘भारताकडे जग एक विश्वासू सहकारी म्हणून पाहतंय’;
फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन!
“आज संपूर्ण जगात अस्थिरतेचे वातावरण असताना, भारत जगासाठी एक ‘विश्वासू सहकारी’ म्हणून पुढे येत आहे. हा भारताच्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा काळ असून देश आता केवळ स्वतःचेच नाही, तर जगाचेही भविष्य घडवत आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी फ्रान्समध्ये केले. पॅरिसमधील ‘साले प्लेएल’ या भव्य सभागृहात अनिवासी भारतीयांना संबोधित करताना ते बोलत होते.पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे भारत आणि फ्रान्समधील मैत्रीचे एक नवे पर्व सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी फ्रान्समधील भारतीयांना ‘विकसित भारत’ या संकल्पाशी जोडण्याचे आवाहन केले. “तुम्ही भारताच्या विकास प्रवासात सहभागी व्हा. यामुळे भारताला तर बळ मिळेलच, पण तुम्हालाही तुमच्या पूर्वजांच्या भूमीची सेवा करण्याची संधी मिळेल,” असे पंतप्रधान म्हणाले.
कनार्टकात डी.के. यांची जादू
विधानपरिषदेत सातपैकी पाच जागांवर काँग्रेसचा झेंडा
डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यानंतर कर्नाटकात झालेल्या पहिल्या निवडणुकीत, सत्ताधारी काँग्रेसने विधान परिषदेच्या सातपैकी पाच जागा जिंकल्या, तर विरोधी भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत. भाजप आणि जेडीएस या दोन्ही पक्षांच्या आमदारांनी क्रॉस-व्होटिंग केले, ज्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. कर्नाटक विधानसभेच्या सदस्यांनी विधान सौध निवडणुकीत मतदान केले. या सात जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे भाजपने देशव्यापी दाखवलेला फंडा भाजपविरोधात वापरत डीकेंनी दणक्यात सुरुवात केली आहे.
करारात इराणचे पारडे जड!
ट्रम्प, पेझेश्कियान यांच्या शांतता करारावर स्वाक्षऱ्या
अमेरिका आणि इराणदरम्यान बहुप्रतिक्षित शांतता सामंजस्य करारावर बुधवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. कराराच्या अटी आणि शर्ती पाहिल्या तर त्यामध्ये इराणचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. इराणमध्ये १९७९ मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर इराण आणि अमेरिकेच्या अध्यक्षांमध्ये झालेला हा पहिलावहिला करार आहे. ‘इराणने आपले वर्तन सुधारले नाही तर त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ले करू,’ असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. पण इराणमध्ये झालेल्या जल्लोषातून, इराणी जनतेने ट्रम्प यांचा इशारा फारसा गांभीर्याने घेतला नाही, असे दिसून येत आहे.दुसरीकडे, ज्या कारणांसाठी अमेरिकेने इराणविरुद्ध युद्ध केले, ते पाहता इराणला या करारातून अधिक मिळाल्याचे बोलले जात आहे.
IPLच्या स्पर्धेत मोठा बदल;
बीसीसीआयनं बदलला पूर्ण ‘गेम टाईम’
जगातील लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या ‘इंडियन प्रीमियर लीग’ बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. BCCI आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सामन्यांची संख्या वाढणार का याबाबत माहिती दिली आहे. आयपीएलमध्ये ७४ सामन्यांऐवजी ९४ सामने होतील अशी चर्चा आहे.पुढील हंगामात ही स्पर्धा साधारणपणे दोन आठवडे आधी सुरू होऊ शकते. २०२६ ची आयपीएल स्पर्धा २८ मार्च ते ३१ मे या कालावधीत झाली होती. मात्र, उष्णता आणि मान्सूनपूर्व कालावधी लक्षात घेता आगामी हंगाम लवकर सुरू करण्याबाबत विचार केला जात असल्याचं बीसीसीआयच्या सचिव म्हणालेत. यावर्षी आयपीएलची सुरुवात २८ मार्चला झाली होती, तर अंतिम सामना हा ३१ मे रोजी खेळवण्यात आला होता.
हवामान बदलाला पुरुषच जबाबदार’;
दिया मिर्झाच्या विधानावरून वादाची ठिणगी Top 10 News :
बॉलिवूड अभिनेत्री आणि पर्यावरण प्रेमी दिया मिर्झा सध्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आलीय. हवामान बदल आणि पर्यावरण संकटासाठी पितृसत्ताक व्यवस्थेला जबाबदार ठरवणाऱ्या तिच्या विधानामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झालाय. अनेकांनी तिच्या वक्तव्यावर टीका केलीय. अभिनेत्री सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या दियाने हवामान बदलाच्या मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी बोलताना तिने हवामान बदलण्याच्या संकटामागील एक मोठे कारण म्हणजे पितृसत्ताक व्यवस्था असल्याचे म्हटले.या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड उठली. वाढत्या ट्रोलिंगनंतर दियाने सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करत आपला मुद्दा स्पष्ट केला. दिया म्हणाली की, हवामान बदल हे केवळ पर्यावरणीय संकट नसून ते सामाजिक आणि आर्थिक असमानतेशीही जोडलेले आहे. शतकानुशतके निसर्गाकडे केवळ साधन म्हणून पाहण्याची वृत्तीमुळे आजची परिस्थिती निर्माण झालीय. ती पुढे म्हणाली की, महिलांना आणि मुलींना हवामान बदलाचे परिणाम सर्वप्रथम आणि सर्वाधिक प्रमाणात भोगावे लागतात असे ती म्हणाली.





