कसून चौकशीनंतरच पुणे विद्यापीठात प्रवेश

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटना, मोर्चांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आली. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून छावणीचे स्वरुपच प्राप्त झाले आहे. पोलिसांकडून कसून चौकशी झाल्यानंतरच विद्यापीठात प्रवेश देण्यात येत आहे.
विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी, मारहाणीच्या घटना घडल्या. पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची तक्रार, राजकीय पक्षांकडून काढण्यात येणारे मोर्चे यामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी पुणे पोलिसांना पत्र दिले होते. त्यावर पुणे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विद्यापीठाच्या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.
विद्यापीठाच्या व सभोवतालच्या 100 मीटर परिसरात विद्यार्थ्यांशिवाय इतर व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. विद्यापीठ परिसरात दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई केली आहे. या आदेशातून विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पोलीस अधिकारी, सुरक्षा अधिकारी यांना वगळण्यात आले आहे. विद्यापीठात परिसरात ध्वनीक्षेपकांचा वापर करण्यास, कोणताही आक्षेपार्ह व दोन गटात वाद होईल असा मजकूर लिहिण्यास व छापील मजकूर चिकटविण्यासही मनाई करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या चक्रामुळे काहीना काही कामानिमित्त येणाऱ्या व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत.





