“आदित्य ठाकरे यांचे नाव ‘पप्पू’ तर “उद्धव ठाकरे यांचं…”; रवी राणांचे ठाकरे पिता-पुत्रावर टीकास्त्र!

मुंबई : नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. राज्यभरातील मंत्री आणि आमदार अधिवेशनासाठी नागपूरला आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना आमदार आदित्य ठाकरेही असून अपक्ष आमदार रवी राणा यांनी ठाकरे पिता-पुत्रावर टीकास्त्र सोडले आहे.
रवी राणा यांनी ट्विटरवर एक पोस्ट करत त्यांनी “उद्धव ठाकरे यांचं नाव ‘बापू’ आहे, तर आदित्य ठाकरे यांचे नाव ‘पप्पू’ आहे. त्यांनी अधिवेशनाचं कामकाज व्यवस्थितपणे पार पडू द्यावं. त्यांनी कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालू नये, राजकारण करू नये, अशी टीका त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी एक व्हिडीओ जारी करत निशाणा साधला आहे.
— MLA Ravi Rana (@mlaravirana_ysp) December 19, 2022
संबंधित व्हिडीओत रवी राणा यांनी, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या लोकांना न्याय देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांनी विदर्भात अधिवेशन आयोजित केलं. या अधिवेशनात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हजर राहत आहेत. खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेंचं नाव ‘बापू’ आहे. त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे म्हणजे ‘पप्पू’ आहे. हे दोघंही विदर्भाच्या धर्तीवर अधिवेशनासाठी येत आहेत. माझी त्यांना विनंती आहे की, अधिवेशन पूर्णपणे व्यवस्थित चालू द्यावं. कुठल्याप्रकारचा गोंधळ करू नये. तुमच्या हाती सत्ता दिल्यानंतर तुम्ही जे करू शकले नाहीत, ते खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस करत आहेत,” अशी टीका रवी राणांनी केली.
तर पुढे सुनील प्रभूंवर टीका करताना रवी राणा पुढे यांनी, “आज सुनील प्रभू सभागृहात बोलले की, मंत्रिमंडळासाठी बांधलेल्या बंगल्यांची साफ-सफाई करण्यासाठी मोठा खर्च केला. अरे तुम्ही कधी विदर्भात अधिवेशन घेतलं नाही. तुमचे मंत्री कधी इकडे आले नाहीत. तुम्ही कधी त्या बंगल्यांमध्ये थांबले नाहीत. तुमची अडीच वर्षाची धूळ साफ करणं गरजेची होती, म्हणून सगळे बंगले स्वच्छ केले. आता याठिकाणी अनेक मंत्री थांबून विदर्भातील जनतेला न्याय देण्याचं काम करत आहेत,” असा टोला रवी राणांनी लगावला.





