Aditya Thackeray Vs Sandeep Deshpande: वरळीत आदित्य ठाकरेंना रोखण्यासाठी ‘मनसे’ तयारी; संदीप देशपांडे उतरणार मैदानात?

Aditya Thackeray Vs Sandeep Deshpande – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (उबाठा) पक्षाला केवळ सात हजार पेक्षा कमी मतांची आघाडी मिळाली. या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मानणारा देखील वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
त्यामुळे मनसेच्या वतीने या मतदार संघात मोठ्या प्रमाणात जनसपंर्कला सुरुवात केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे या संदर्भात सत्यात्याने भूमिका मांडत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे (उबाठा)चे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसेचे संदीप देशपांडे लढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सन २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आलेल्या आदित्य यांची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे आदित्य हे पहिलेच ठाकरे असल्याने, मनसेने त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नव्हता.
वरळी हा दक्षिण मुंबईतील महत्वाचा मतदारसंघ आहे. उच्चभ्रू, मध्यमवर्गीय यांच्याबरोबरीने चाळवस्ती असा संमिश्र भाग या मतदारसंघात येतो. काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन वरळी येथील समस्यांवर चर्चा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी वरळीच्या समस्याच सोडविण्यासाठी निर्देश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यलयातून सांगण्यात आले आहे.
सन २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत मनसेने ३० हजारांच्या आपपास मते घेतली होती. सध्याच्या घडीला मनसेचे संदीप देशपांडे सातत्याने भूमिका मांडून आमदार आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर टीका करत आहेत. त्यामुळे कदाचित आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासमोर संदीप देशपांडे यांचे आव्हान असू शकणार आहे.





