पक्षाचे चिन्ह आणि नाव शिंदे गटाकडे गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी शेअर केला ‘तो’ फोटो; बोलक्या फोटोवर अनेकांच्या प्रतिक्रिया

मुंबई : निवडणूक आयोगाने ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट यांच्यातल्या वादावर निकाल देत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या हातात धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव शिवसेना हे दोन्ही राहिले नाहीत. मात्र या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला. या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी सविस्तर प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली. मात्र आदित्य ठाकरेंनी एक फोटो पोस्ट आणि त्यातून त्यांनी शिवसैनिकांना संदेश दिला.
आदित्य ठाकरेंनी कालच्या निर्णयावर एकच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत मातोश्रीमधल्या एका खिडकीत बाळासाहेब ठाकरे उभे आहेत. त्यांच्या एका बाजूला उद्धव ठाकरे उभे आहेत छान हसत ते बाहेर पाहात आहेत तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे आहेत.हा फोटो जुना फोटो असला तरी या फोटोत आदित्य ठाकरे यांचा चेहरा बराच गंभीर आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 17, 2023
शिवसेनेत जून २०२२ ला जी फाटाफूट झाली त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढत पक्ष सावरण्याचा आणि कार्यकर्त्यांना नवी उभारी देण्याचा खूप प्रयत्न केला हे महाराष्ट्राने पाहिलेच आहे. मात्र आज निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर आदित्य ठाकरे यांची कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
आदित्य ठाकरेंनी आजोबा बाळासाहेब ठाकरे, वडील उद्धव ठाकरे आणि आपला फोटो पोस्ट केला आहे. तीन पिढ्या या फोटोत दिसत आहेत. तीन पिढ्यांकडे असलेला शिवसेना हा पक्ष आज निवडणूक आयोगाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला आहे. त्यामुळे आता पुढे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना संघर्ष करावा लागणार हे उघड आहे. काहीही बोलण्यापेक्षा एक फोटो पोस्ट करत आम्ही संघर्ष करणार हेच जणू या फोटोतून आदित्य ठाकरे सांगत आहेत. या फोटोची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.





