Aditya Thackeray : “सरकार स्थापनेतील विलंब हा महाराष्ट्राचा अपमान” – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray – सरकार स्थापनेतील विलंब हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे टीकास्त्र ठाकरेसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी सोडले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू न होण्याविषयीही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महाविजय मिळवून सत्ता राखल्यानंतरही महायुतीचे नवे सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया रखडली. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अखेर आठवडाभराने नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त जाहीर करण्यात आला.
मात्र, मुख्यमंत्री पदाविषयीचा सस्पेन्स अजूनही संपलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर, आदित्य यांनी सोशल मीडियावरून उपहासात्मक शैलीत एक पोस्ट प्रसिद्ध केली. सत्ता राखणारे अद्याप मुख्यमंत्री ठरवू शकलेले नाहीत.
तसेच, सरकार स्थापन करू शकले नाहीत. ती बाब केवळ महाराष्ट्राचाच नव्हे; तर प्रिय निवडणूक आयोगाने केलेल्या मदतीचाही अपमान आहे. नियम केवळ विरोधी पक्षांना लागू होतात; विशेष असणाऱ्यांना नव्हे असे दिसून येते.
सरकार स्थापनेसाठी अद्याप दावा करण्यात आलेला नाही. राज्यपालांपुढे संख्याबळ सादर करण्यात आलेले नाही. तसे असूनही एकतर्फीपणे शपथविधीची तारीख जाहीर करणे ही निव्वळ अराजकता आहे. सरकार स्थापन करू शकणाऱ्यांसाठी महाराष्ट्र प्राधान्यक्रमावर असल्याचे वाटत नाही.
ते दिल्लीवाऱ्यांचा आनंद घेण्यात मग्न आहेत, अशी शाब्दिक टोलेबाजी आदित्य यांनी केली. आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू व्हायला नको होती का? विरोधकांकडे संख्याबळ असते आणि त्यांच्याकडून सरकार स्थापनेची प्रक्रिया रखडली असती;
तर एव्हाना राष्ट्रपती राजवट लागू झाली नसती का, अशा प्रश्नांची सरबत्तीही त्यांनी केली. निकालानंतर जवळपास दोन आठवड्यांनी नव्या सरकारचा शपथविधी होईल. त्याचा आधार घेऊन आदित्य यांनी भूमिका मांडली.





