“मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही”आदित्य ठाकरे यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

वडगाव मावळ, दि. 24 (प्रतिनिधी) -महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा गुजरातने घेतला. सध्या राज्याचे खरे मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही, अशी टीका माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा उल्लेख खोके सरकार असा करत ठाकरे म्हणाले की, फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला यात केंद्र किंवा गुजरात सरकारचा नव्हे तर खोके सरकारचा दोष आहे.
फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने निषेधार्थ शिवसेनेने वडगाव मावळ येथे जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करत ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले की, रोजगारासाठी तरुणांना लाठी खावी लागते हे दुर्दैव आहे. राज्यातील सध्याचे सरकार नसून एक सर्कस आहे. सध्या राज्यातील तरुणांचा रोजगार जातोय. महाविकास आघाडी सरकार असते तर वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात आणलाच असता.
मी ही राजीनामा देतो
चाळीस आमदारांसोबत मीही राजीनामा देतो, सर्वजन निवडणुकीला सामोरे जाऊ, असे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना केले. माझ्या गटात कोण येतंय त्यापेक्षा महाराष्ट्रात रोजगार कोण आणतेय ते पाहा. आमच्यावर चाळीस वार केलेत पण राज्यातल्या जनतेवर वार करू नका. शिंदे सरकार हे सरकार नसून ती एक सर्कस आहे, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी यावेळी
बोलताना लगावला.





