Aaditya Thackeray : ‘या’ दिवशी आदित्य ठाकरे भरणार उमेदवारी अर्ज; करणार जोरदार शक्ती प्रदर्शन

Aaditya Thackeray । Mahavikas Aghadi । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असली तरी राजकीय पक्षांमधील जागावाटप अद्याप झालेले नाही. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाडीने जागा जाहीर केलेल्या नाहीत.
मात्र, अश्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव, आमदार ‘आदित्य ठाकरे’ लवकरच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून 24 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला जाणार असून महाविकास आघाडीतील काही महत्त्वाचे नेते सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
विधानसभेसाठी 22 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे.
28 जागांवर तोडगा अजून बाकी :
महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील 288 पैकी 260 जागांवर एकमत झाले असले तरी राज्यात 28 जागा अशा आहेत, ज्यावर हे प्रकरण अजूनही अडकले आहे.
काँग्रेस पक्षाने ही यादी हायकमांडकडे पाठवली असून, या जागांवरचे मतभेद मिटवण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेही चर्चा करणार आहेत. महाविकास आघाडी दोन दिवसांत जागावाटप जाहीर करणार आहे.
दरम्यान, जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची बैठक गुरुवारी तब्बल नऊ तास चालली. सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही सभा रात्री 8 वाजता संपली.
बैठकीत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जागांवर चर्चा झाली आणि त्यात 260 जागांवर तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमत झाले, तर उर्वरित 28 जागांवर पुढील चर्चा सुरू राहणार आहे.
यामध्ये 20 ते 25 जागांवर शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जोरदार मुसंडी मारत आहेत.





