काॅंग्रेस नेते अधीर रंजन द्रौपदी मुर्मूंना म्हणाले “राष्ट्रपत्नी”; आता माफी मागत म्हणाले…

नवी दिल्ली – विजय चौक येथून राष्ट्रपती भवनकडे मार्च करत असताना आम्हाला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी एका पत्रकाराने आम्हाला विचारले कुठे जायचे आहे. तेव्हा माझ्या तोंडातून राष्ट्रपती ऐवजी राष्ट्रपत्नी असा शब्द आला. ती चूक झाली. मी बंगाली भाषिक माणूस आहे, हिंदी भाषिक नाही. तोंडातून शब्द गेला. हेतू वाईट नव्हता. त्या देशाच्या सर्वोच्च पदावर आहेत, आम्ही त्यांचा सन्मान करतो.
आज सभागृहातही मला माझी बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही. सत्ताधाऱ्यांनी माझ्यावर आरोप केले आणि कामकाज ठप्प केले. भाजपला छोट्या गोष्टीचा पर्वत (राई का पहाड) बनवण्याची सवयच आहे अशी टीका चौधरी यांनी एका इंग्रजी वाहिनीशी बोलताना केली. ते पुढे म्हणाले की एक महिला आमच्या पक्षाच्या अध्यक्षा आहेत. जर आम्ही महिलांचा सन्मान करत नसू तर कसे आम्ही आमच्या नेत्याचे कसे ऐकतो? ते आरोप करताहेत हे ठिक आहे. मात्र उत्तर देण्याचा मलाही अधिकार आहे.
ज्या अर्थमंत्र्यांचे सभागृहात दर्शन होत नाही त्याही आज सभागृहात येत माझ्यावर आरोप करत आहेत. एका मंत्र्यांवर आम्ही गोव्यातल्या प्रकरणावर आरोप केले. त्याचा माझ्यावर सूड उगवला जातो आहे. मी एकदा नाही शंभर वेळा म्हणतो की माझी चूक झाली. माणसाकडूनच चुका होतात. मी हिंदीभाषिक नसल्याने हे झाले. त्याउपरही राष्ट्रपतींना वाईट वाटत असेल तर मी त्यांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करेन.
अधीर रंजन यांना नोटीस
राष्ट्रपतींबद्दल अपमानकारक शब्द उदगारल्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने अधीर रंजन चौधरी यांना नोटीस बजावली आहे. 3 ऑगस्ट रोजी आयोगापुढे या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री किरन रिजीजू यांनीही कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. जेव्हा द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जाहीर केली तेव्हापासून कॉंग्रेस सातत्याने त्यांच्यावर टीका करत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.





