आदर्श सरपंच : किरकटवाडीचा उपनगरीय कायापालट उपसरपंच हरेश मंडल यांची यशस्वी वाटचाल

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या नव्या गावांपैकी एक गाव म्हणजे किरकटवाडी. शहरालगत सिंहगड रस्त्यावरील एक टुमदार गाव म्हणून ओळख असलेल्या किरकटवाडीचे गाव ते शहराचे उपनगर होण्याच्या या स्थित्यंतराचे साक्षीदार असलेले उपसरपंच हरेश गुलाब मंडले यांनी या किरकटवाडीला खऱ्या अर्थी दिशा दिली. सामान्य कुटुंबातील एक सामान्य मुलगा असलेले हरेश यांनी कला शाखेचे पदवीधर होताना गावातील आणि ग्रामस्थांच्या अडचणी जवळून पाहिल्या. वडील गुलाब मंडले हे पोलीस खात्यामध्ये असल्याने ग्रामस्थ अनेक तक्रारी घेऊन त्यांच्याकडे येत असल्याने त्या सोडविण्याची बहुतांशी जबाबदारी हरेश यांच्यावर येऊन पडत असे. यातूनच समाजसेवा, अन्यायाविरुद्ध लढा हे गुण आपोआपच निपजत गेले.
हरेश यांच्या मनात येथूनच समाजसेवेची आणि आपल्या गावाविषयी काही तरी करण्याची जिद्द निर्माण झाली. हरेश यांच्या वडिलांच्याही हे लक्षात येत होते. त्यामुळेच त्यांनी हरेश यांना समाजसेवेबाबत दिशा देण्याचाच प्रयत्न केला. किरकटवाडीसह आसपासच्या भागात कोणतीही समस्या असली तरी ती समजल्याबरोबर हरेश तेथे सेवेस हजर राहात असत, त्यांच्या याच तत्परतेतून हरेश मंडले हे नाव आपल्या “हक्काचा माणूस’ म्हणून किरकटवाडी परिसरात अगदी अबालवृद्धांत प्रचलित झाले. ग्रामस्थांच्या याच पाठबळावर विश्वास ठेवून हरेश यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ते किरकटवाडीचे उपसरपंच झाले.
या पदावर कार्यरत असताना गावातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. शासकीय निधीची वाट पाहात बसण्यापेक्षा शक्य तेथून समस्या सोडविण्यात हरेश मंडले यांचा हातखंडा होता. गावाच्या पाण्याच्या टाकीचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अगदी मर्यादित निधी होता; परंतु हे काम पूर्ण होणे गरजेचेच होते. ही बाब लक्षात घेत त्यांनी परिसरातील गृहप्रकल्पांच्या बांधकाम व्यावसायिकांशी संपर्क साधून गावाची पाणी समस्या सोडविण्याकामी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यातून मदतीची एक एक कडी जोडली गेली आणि अनेकांच्या सहकार्यातून गावासाठी पाण्याची टाकी उभी राहिली; परंतु नांदेड गाव ते किरकटवाडी यादरम्यान जलवाहिनी टाकण्याचे काम हे एक मोठे आवाहन होते.
परंतु, यंत्रणेशी सातत्याने पाठपुरावा आणि ग्रामस्थांशी संवाद तसेच अन्य सदस्यांना सोबतीला घेऊन हा प्रश्न सोडविण्यात हरेश यांना यश आले. सर्वांना सोबत घेऊन तसेच ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करण्याचा हरेश मंडले यांचा “पॅटर्न’ गाव परिसरात चांगलाच परिचित झाला होता. गावात जुनी घरे असल्याने त्याअंतर्गत रस्ते बांधण्यास अडचण येत होती तीही हरेश यांनी संवादातून अगदी सहज सोडविली. याशिवाय वाड्या वस्त्यांमध्ये अंतर्गत रस्त्यांचे जाळे, ड्रेनेजलाइनचे काम यातून हरेश यांची गावाप्रती विकासाची दिशा ग्रामस्थांच्या सहज लक्षात आली.
किरकटवाडी परिसरातील खाणीतून अवजड वाहतूक येथूनच होत असल्याने प्रदूषणासह अपघात वाढल्याने तसेच यात काहींचा मृत्यू झाल्याने अशी अवजड वाहतूक बंद करण्याबाबत हरेश मंडले यांनी सर्वात प्रथम आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यावेळी सर्व ग्रामस्थ तसेच परिसरातील हजारो गावकरी मंडले यांच्या मागे ठामपणे उभे राहिले. याचवेळी त्यांची जनमाणसांतील ताकद दिसून आली. त्यांना या कामात पत्नी प्रतीक्षा हरेश मंडले व मित्रमंडळी यांची साथ लाभली आहे.
गावाचे उपनगर होताना…
आपल्या किरकटवाडीचे गावपण जपत उपनगर होत असतानाच प्रथम नगरसेवक पदासाठी एक आश्वासक चेहरा म्हणून हरेश मंडले यांच्याकडे पाहिले जाते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मनातील किरकटवाडी कशी असावी आणि त्यासाठी नेमके काय करावे, याविषयी त्यांनी मांडलेली रोखठोक भूमिका त्यांच्याच शब्दांत…
हरेश म्हणतात की, कोणत्याही गावाचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी आधी पूर्वआराखडा तयार करणे गरजेचे आहे. किरकटवाडीच्या प्रारूप आराखड्याविषयी सातत्याने पालिका प्रशासनाशी संपर्कात आहे. या आराखड्याविषयी ग्रामस्थांची मते महत्त्वाची ठरतात. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊनच पालिकेने आराखडा तयार करावा, तरच तो सर्वसमावेशक होईल. भावी पिढ्यांच्या गरजा लक्षात घेऊन आताच्या आपल्या गरजा सीमित ठेवून विकास करणे याला शाश्वत विकास आराखडा म्हणावे लागेल. यामध्ये पाणी, वीज, रस्ते, आरोग्य अशा मूलभूत सुविधा अधिकाधिक सक्षमपणे कशा दिल्या जातील, ही बाब महत्त्वाची वाटते. केवळ मालमत्ता कर, पाणी कर याचा भार आमच्यावर लादू नये.
ग्रामपंचायत काळात ग्रामविकास आराखडा तयार करून वित्त आयोगाच्या निधीचा वापर आम्ही अतिशय योग्य पद्धतीने करीत किरकटवाडीचा विकास साधला आहे. जिल्हा परिषद 10 टक्के, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीला 80 टक्के निधी उपलब्ध होत असतो. यातूनही गावच्या विकासात अडचणी आल्या; परंतु आम्ही त्यामध्ये कमी पडलो नाही. किरकटवाडीचा समावेश आता महापालिकेत झाल्याने त्याच प्रमाणात निधी आमच्या किरकटवाडीला उपलब्ध झाला पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे.
नगरसेवक होताना…
गावागावांत राजकीय घराणेशाही दिसून येते. गावच्या विकासात ही चांगली गोष्ट नाही. राजनीतीत राहून “राजकारण’ खेळण्यात काही लोक पटाईत असतात. “गावाचा विकास’ त्यांनी स्वतःच्या बॅंक खात्यात जमा करून ठेवलेला असतो. काही जण केवळ राजकीय कारकीर्द जपण्यासाठी या क्षेत्रात येतात, अशांना गावाच्या विकासाशी काहीही देणेघेणे नसते. अशा विचारांच्या नेतृत्वातून गावाचं नुकसानच होते. यासाठी एक जिद्द आणि चिकाटी असलेलं सक्षम नेतृत्व कुठल्याही गावात असायला हवे, असे हरेश मंडाले यांचे ठाम मत आहे. आता, किरकटवाडी महापालिकेत समाविष्ट झाली आहे. यासाठीच्या निवडणुका होतीलच.
नगरसेवकाने ठरवलं तर आपल्या छोट्याशा राज्याला (गाव/उपनगराला) तो नंदनवन बनवू शकतो. मात्र, सर्वप्रथम त्याने तसा अभ्यास करणे गरजेचे आहे. अर्थातच हे वाटतं तितकं सोपही नाही; परंतु केवळ जनतेचा ध्यास याच गोष्टीचा विचार करून सेवावृत घेतलं की नक्कीच मार्ग सापडतो, असे मला वाटते. आमची किरकटवाडी एक आदर्श गाव, आदर्श उपनगर म्हणून घडवायचे आहे, सध्या तरी हेच ध्येय ठेवले असल्याचे हरेश मंडले अगदी स्पष्ट सांगतात.
संकलन : जयंत जाधव, सिंहगड रोड







