आदर्श सरपंच : नानगावला गावपण देणारे माजी उपसरपंच संदीप खळदकर

तीन पिढ्यांचा राजकीय, सामाजिक वारसा लाभलेले नानगावचे खळदकर कुटुंब. घरातच संस्कार, राजकारणाचे बाळकडू मिळाल्याने संदीप खळदकर यांना एक दिशा मिळाली. सामाजिक कार्य करत करीत त्यांनी राजकारणात एक आदर्श निर्माण केला आहे. उपसरपंचपदाची संधी मिळाल्यानंतर लोकसहभागातून विकासकामांचा परिपाठ त्यांनी दौंड तालुक्यासमोर घालून दिला आहे. त्यांच्या कार्यकाळातील घेतलेला आढावा….
दौंड तालुक्यातील नानगाव हे नऊ हजार इतक्या लोकसंख्येचे गाव आहे. सन 2021 मध्ये श्री. संदीप पोपटराव खळदकर पाटील यांनी वयाच्या 43 व्या वर्षी नानगावच्या उपसरपंचपदाची जबाबदारी स्वीकारली. गावाला नवी दिशा मिळाली. संदीप खळदकर यांचे शिक्षण बी. ए. झाले असून कौटुंबिक, राजकीय वारसा असल्याने राजकारण व समाजकारणात त्यांनी ठसा उमटवला आहे.
संदीप खळदकर यांचे आजोबा (स्व) बापूराव गुलाबराव खळदकर हे नानगावचे 10 वर्षे सरपंच होते. त्यांनी नानगावचे मुलकी पाटील म्हणून गावासाठी भरीव, असे योगदान दिले आहे.
चुलते ऍड. अशोकराव खळदकर हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आजीव सदस्य असून बंधू श्री. विकास खळदकर हे 15 वर्षे ग्रामपंचायत सदस्य आहेत. सध्या दौंड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष आहेत. म्हणून राजकारणाचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालेले आहेत. त्याच्या वाटेवर त्यांचा मार्ग सुकर होण्यास पुरेसा वाव मिळाला. उपसरपंचपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर त्यांनी गावचा विकास डोळ्यापुढे ठेवून सरपंच सौ. स्वप्नाली शेलार यांच्या बरोबरीने शासकीय विविध योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. करोना काळात घरात न बसता प्रभावीपणे लसीकरण मोहीम राबवून नानगाव या ठिकाणी शासकीय 60 बेडचे करोना सेंटर चालू करण्यासाठी अथक प्रयत्न केले. अनेक गरीब रुग्णांच्या आयुष्यात दिवा लावण्याचे भाग्य लाभले असल्याचे संदीप खळदकर सांगतात.
अनेक वर्षांपासून नानगाव ग्रामस्थांची स्वछ पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या होती. त्यासाठी केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेच्या माध्यमातून गावच्या सर्व वाड्या- वस्त्यांचा सर्व्हे केला. 14 कोटी 50 लाख रुपयांची एक महत्त्वाकांक्षी योजना मंजूर झाली आहे. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली असून आठ महिन्यांत ही योजना कार्यान्वित होईल. ग्रामस्थांची अनेक वर्षांची स्वच्छ पाण्याची प्रतीक्षा संपणार आहे. नानगावमधून जाणारा 8 किलोमीटरचा अष्टविनायक महामार्ग होण्यासाठी अडचणीच्या ठिकाणी संबंधित शेतकरी व महामार्ग अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी समन्वय घडवून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून अष्टविनायक महामार्ग कसा दर्जेदार होईल, यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केला आहे.

ग्रामदैवत श्री रासाई देवीमातेचे मंदिर परिसरात अनेक वर्षांपासूनचे अतिक्रमण सामंजस्याने काढण्यात आले. प्रवेशद्वार व दीपमाळचे सुशोभीकरण करणे गरजेचे होते. म्हणून लोकसहभागातून हे काम हाती घेतले. अगदी पुरातन ढाच्यात दगडाच्या कोरीव कलाकुसरीत हे काम चालू आहे. ते अंतिम टप्प्यात आले आहे. श्री. रासाईदेवीची पुरातन मूर्ती जीर्ण झाली असल्याने नवीन मूर्ती घडवून तिची पूर्ण प्राणप्रतिष्ठा शासकीय पुरातन विभागातील तज्ज्ञ व प्रसिद्ध पुरोहित यांच्याकडून करण्यात आली. तज्ज्ञांच्या मते ही मूर्ती सुमारे 400 वर्षे पुरातन आहे. पुण्याईचे काम त्यांच्या हातून घडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याचबरोबर वित्त आयोगातून नानगाव, गणेशरोड, अमोनीमाळ या ठिकाणी जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती, सुशोभीकरण, वाड्या- वस्त्यांवर रस्ते, पेव्हिंग ब्लॉक, भूमिगत गटारे आदी कामे करण्यात आली आहेत. अनेक वर्षांपासूनचा नानगाव गावठाण ते गुंडवस्ती हा बंद असलेला रस्ता तेथील शेतकऱ्यांशी चर्चा करून सामोपचाराने 15 वर्षांनंतर खुला करण्यात आला. तसेच राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून केडगाव- नानगाव तसेच नानगाव- खोपोडी हे रस्ते मंजूर करून त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व सोईयुक्त, असे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहे. यातून ज्येष्ठांना एक हक्काचा आधार खळदकर यांनी दिला आहे. हे सर्व काम करीत असताना सर्व ग्रामपंचायत सहकारी सदस्यांनी खळदकर यांना मोलाची साथ दिली.





