सातारा । आदर्शने स्वीकारले शहीद जवानांच्या कन्यांचे पालकत्व

खेड – देशसेवा करताना कित्येक जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या शहीद जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आदर्श प्रतिष्ठानने ‘कारगिल विजय दिनाचे’ औचित्य साधून शहीद जवानांच्या मुलींचे पालकत्व स्वीकारले आहे. विशेष म्हणजे नगर येथील काही सुकन्यांच्या पौष्टिक आहारासाठी प्रत्येकी ६ हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटपही केले.
आदर्श प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष राहुल ढवाण यांच्या संकल्पनेतून ‘कारगिल विजय दिनानिमित्त’ भारतीय लष्करात सेवा करणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबातील मुलींची माहिती घेऊन त्यांचे पालकत्व स्वीकारण्यात आले.आदर्श प्रतिष्ठान संस्थेने सुकन्या योजने अंतर्गत १४ वर्षासाठी मुलींचे पालकत्व घेऊन त्यांची पोस्टात बँक खाती काढून त्यात ‘भविष्य निधी’ खात्यावर रक्कम वर्ग करणार असल्याचे राहुल ढवाण यांनी सांगितले. नगर येथे अशा सुकन्यांना पौष्टीक आहारासाठी त्यांच्या मातांकडे प्रती ६ हजार रुपये रक्कमेचा धनादेश देऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शहीद जवानांच्या कुटुंबातील मुला-मुलींना शालेय साहित्याचे वाटपही राहुल ढवाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे व्यवस्थापक नीलेश मोरे यांनी संस्थेच्या उपक्रमांबाबत माहिती सांगत भविष्यात संस्थेकडून अशा अनेक कुटुंबांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी आदर्शचे मानद विश्वस्त अक्षय फलके, व्यवस्थापक नीलेश मोरे, गायत्री साबळे, अर्चना परकाळे आदी मान्यवर उपस्थित होते. सुकन्या उपक्रमाचे समन्वयक तथा माजी निवृत्त लष्कर जवान हनुमंत जाधव यांनी संस्थेच्या उपक्रमाला कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे महत्वपूर्ण काम केले.





