Adani Group : अदानी समूहाची स्विस बँकेतील खाती गोठवली; हिंडेनबर्गचा दावा

नवी दिल्ली/बर्न – मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणुकीच्या तपासाचा भाग म्हणून स्विस अधिकाऱ्यांनी अदानीच्या अनेक बँक खात्यांमध्ये जमा केलेले ३१ कोटी डॉलर्स (सुमारे २६०० कोटी रुपये) गोठवण्यात आले असल्याचा दावा करत हिंडेनबर्गने पुन्हा एकदा अदानी समूहावर हल्लाबोल केला. २०२१ पासून ही चौकशी सुरू असल्याचेही हिंडेनबर्गच्या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, हे आरोप अदानी समुहाने फेटाळून लावले आहेत.
हिंडेनबर्गने दावा केला की, अदानी समूहाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग आणि सिक्युरिटीज फ्रॉडच्या आरोपांच्या चौकशीचा एक भाग म्हणून स्विस अधिकाऱ्यांनी सहा स्विस बँक खात्यांमध्ये जमा केलेली ३१ कोटी डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम गोठवली आहे.
अमेरिकन शॉर्टसेलर हिंडेनबर्ग ग्रुपने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या स्विस क्रिमिनल कोर्टाच्या रेकॉर्डचा हवाला देत ही माहिती दिली. २०२१ पासून सुरू असलेल्या या तपासात भारतीय समूहाशी संबंधित संशयित ऑफशोर कंपन्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर प्रकाश टाकण्यात आल्याचेही हिंडेनबर्गने म्हटले.
अदानी समूहाच्या प्रवक्त्याने हे आरोप निरर्थक, अतार्किक आणि बिनबुडाचे असल्याचे सांगत स्विस कोर्टाच्या कोणत्याही कार्यवाहीत अदानी समूहाचा सहभाग नाही आणि आमच्या कंपनीचे कोणतेही खाते कोणत्याही प्राधिकरणाने गोठवलेले नाही, असे म्हटले आहे.
अदानी समूहाने मात्र न्यायालयाच्या आदेशाचा त्यांच्याशी संबंध नसून त्यात त्यांचा उल्लेख नसल्याचे म्हटले आहे. तसेच स्विस न्यायालयाने आमच्या समूह कंपन्यांचा उल्लेख केलेला नाही किंवा आम्हाला अशा कोणत्याही प्राधिकरण किंवा नियामक संस्थेकडून स्पष्टीकरण किंवा माहितीसाठी कोणतीही विनंती प्राप्त झाली नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.





