Acupressure Therapy : शारीरिक तसेच मानसिक समस्यांपासून दिलासा मिळवण्यासाठी अॅक्युप्रेशर थेरपी अतिशय उपयुक्त मानली जाते. मात्र, शरीरातील योग्य बिंदूंवर अॅक्युप्रेशर केल्यासच त्याचा अपेक्षित फायदा मिळतो. जागतिक अॅक्युप्रेशर थेरपी दिनानिमित्त, तणाव कमी करण्यासाठी शरीरातील महत्त्वाचे अॅक्युप्रेशर पॉइंट्स जाणून घेऊया. खांदे आणि मान यांचा मिलनबिंदू दिवसभराचा ताण बहुतांश वेळा खांदे आणि मानेत साठतो. मान आणि कवटी जिथे एकत्र येतात त्या भागावर दोन बोटांनी सुमारे २० सेकंद हलकासा दाब देऊन मसाज केल्यास तणाव कमी होतो. ऑफिसमध्ये बसल्या-बसल्या हा उपाय सहज करता येतो आणि लगेच रिलॅक्स वाटते. अमाशयाचा बिंदू अमाशय नाभीच्या थोडं वर असतो. अनेक रिफ्लेक्सोलॉजिस्ट हा बिंदू महत्त्वाचा मानतात. या ठिकाणी अॅक्युप्रेशर केल्याने छाती आणि डायफ्रामवरील ताण कमी होतो. यामुळे श्वास घेण्याची प्रक्रिया सुधारते आणि मन शांत होतं. पायाचा मध्यबिंदू पायाच्या अगदी मध्यभागी असलेला हा बिंदू मेंदूला शांतता देण्यासाठी उपयुक्त मानला जातो. हा अॅक्युप्रेशर पॉइंट तणाव कमी करतो आणि शरीराच्या क्रियांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो. काही तज्ज्ञांच्या मते, हा बिंदू अग्नाशयाशी (पॅनक्रियाज) संबंधित आहे. हातांवरील बिंदू हातांवर दाब दिल्यास तणाव लवकर कमी होतो. हा शरीरातील महत्त्वाच्या ऊर्जा चॅनेलपैकी एक आहे. हा बिंदू हृदय, यकृत आणि अग्नाशयावर परिणाम करतो. तणाव बहुतेक वेळा यकृताशी संबंधित असतो, त्यामुळे या बिंदूवर अॅक्युप्रेशर केल्यास खूप आराम मिळतो. दंडावरील बिंदू रिफ्लेक्सोलॉजी आणि अॅक्युपंक्चरमध्ये दंडावरील बिंदू फार महत्त्वाचा मानला जातो. तणाव आणि थकव्यामुळे शरीरातील ऊर्जेचा प्रवाह विस्कळीत होतो. अशावेळी या बिंदूवर अॅक्युप्रेशर केल्याने ऊर्जेचा प्रवाह सुधारतो, मानसिक एकाग्रता वाढते आणि तणाव कमी होतो. नियमितपणे योग्य पद्धतीने अॅक्युप्रेशर थेरपी केल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहण्यास मदत होते.