Vegetarian Diet: शाकाहार : आरोग्य, विचार आणि दीर्घायुष्याचा मूलमंत्र
निसर्गोपचारात “अन्न हे औषध म्हणून घ्या” असे सांगितले जाते. आहाराला औषध समजून त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक घटकांचा समावेश केला आणि अपायकारक घटक टाळले, तर शरीराची योग्य वाढ होऊन आजारांपासून दूर राहणे सहज शक्य होते.

Vegetarian Diet: “जसा आहार तसा विचार” ही म्हण केवळ शब्दांची नाही, तर आरोग्यशास्त्राची ठाम भूमिका आहे. माणूस जसा आहार घेतो, तसेच त्याचे विचार, आचार आणि एकूणच जीवनशैली घडत जाते. आरोग्य, विचारशक्ती आणि रोगप्रतिकारक क्षमता या सगळ्यांचा थेट संबंध आपण घेत असलेल्या आहाराशी असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
निसर्गोपचारात “अन्न हे औषध म्हणून घ्या” असे सांगितले जाते. आहाराला औषध समजून त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक घटकांचा समावेश केला आणि अपायकारक घटक टाळले, तर शरीराची योग्य वाढ होऊन आजारांपासून दूर राहणे सहज शक्य होते. माणसाच्या शरीरात रोगांशी लढण्याची आणि त्यांना रोखण्याची नैसर्गिक क्षमता असते. ही क्षमता वाढवणे, टिकवणे आणि योग्य निसर्गोपचारांची जोड देणे हाच खऱ्या अर्थाने आरोग्याचा मूलमंत्र मानला जातो.
सात्विक आहार, सात्विक विचार
सात्विक आहार घेणारा माणूसही सात्विक विचारांचा बनतो, तर तामसी आहार माणसाच्या स्वभावावर विपरीत परिणाम करतो, असे आयुर्वेद सांगतो. “जसा आहार तसा विहार” या उक्तीप्रमाणे आहाराचा थेट परिणाम माणसाच्या वागणुकीवर होतो. त्यामुळे कोणता आहार घ्यावा, किती घ्यावा आणि का घ्यावा याचे शास्त्रीय ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.
निसर्गोपचाराच्या सिद्धांतानुसार पोटात अर्धा भाग अन्न, पावभाग पाणी आणि पावभाग हवा एवढ्याच प्रमाणात आहार घेणे योग्य मानले जाते. यामुळे पचन आणि अन्नशोषणाची प्रक्रिया सुरळीत होते आणि अन्न शरीराला योग्य प्रकारे पोषक ठरते.

Vegetarian Diet
आहाराची चार मुख्य कार्ये
आहाराचे कार्य प्रामुख्याने चार प्रकारचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात,
१) शरीराला ऊर्जा देणे
२) शरीराची झीज भरून काढणे
३) शरीराची वाढ घडवणे
४) रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणे
अयोग्य किंवा अधिक खाणे यामुळे अनेक आजार ओढवतात. “अन्न तारी, अन्न मारी, अन्न नाना विकार करी” ही म्हण याच अर्थाने सांगितली जाते. काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, माणूस आजाराने मरत नाही, तर चुकीच्या आहारामुळे स्वतःलाच मारतो.
‘चार पांढरे राक्षस’ ठरतात घातक
आरोग्याच्या दृष्टीने साखर, मीठ, मैदा आणि चरबीयुक्त पदार्थ हे ‘चार पांढरे राक्षस’ मानले जातात. काही तज्ज्ञांनी तर यांना विषाची उपमाही दिली आहे. त्यामुळे आहारात या घटकांचा अतिरेक टाळणे आवश्यक आहे.
आयुर्वेदानुसार शाकाहार सर्वोत्तम
आहार कोणता घ्यावा हे व्यक्तीची प्रकृती, वय आणि ऋतू यावर अवलंबून असले तरी आयुर्वेदानुसार शाकाहार हा सर्वाधिक योग्य मानला जातो. संशोधनानुसार शाकाहारात प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. त्यात अपाच्य घटक आणि चरबी कमी असल्याने तो सुपाच्य ठरतो. त्यामुळे पचनसंस्थेवर ताण पडत नाही आणि इंद्रिये दीर्घकाळ सक्षम राहतात.
शाकाहारामुळे वजन वाढण्याची शक्यता कमी असते. शिवाय शाकाहारी अन्नातील घटकांचे शोषण शरीरात लवकर होते.

Vegetarian Diet
उर्जेतही शाकाहार पुढे
संशोधनानुसार १०० ग्रॅम मांसात सुमारे ११८ कॅलरीज असतात, तर १०० ग्रॅम बीन्समध्ये १५८ कॅलरीज आणि कडधान्यांमध्ये सुमारे २०० कॅलरीज असतात. सुक्या मेव्यामध्ये तर ४०० कॅलरीजपर्यंत ऊर्जा आढळते. म्हणजेच शाकाहारी पदार्थ उर्जादायी तर आहेतच, पण ते पचवण्यासाठी शरीराला कमी ऊर्जा खर्च करावी लागते.
तसेच मांसाहाराच्या तुलनेत शाकाहार अधिक स्वस्त असल्याचेही दिसून येते. त्यामुळे आरोग्य, खर्च आणि जीवनमान या तिन्ही दृष्टीने शाकाहाराची निवड अधिक योग्य ठरते.
म्हणूनच मांसाहार करून आजारांना आमंत्रण देण्यापेक्षा शाकाहार स्वीकारून निरोगी आणि दीर्घायुषी जीवन जगावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण अखेरीस “आरोग्यम् धनसंपदा” म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.





