अभिनेत्री रसिका सुनीलने वाढदिवसानिमित्त खरेदी केली आलिशान कार

मुंबई – झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून अभिनेत्री रसिका सुनील घरा-घरात पोहचली. या मालिकेतील तिच्या भूमिकेने अनेकांची मनं जिंकली. या मालिकेनंतर रसिका सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. अनेक व्हिडिओ आणि फोटो ती इनस्टाग्रामवर शेअर करत असते. नुकतेच रसिकाने तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
रसिकाने वाढदिवसानिमित्त स्वत:ला एक आलिशान कार गिफ्ट केली आहे. ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. लँडमार्क कारने रसिकाला इन्स्टाग्रामवर टॅग करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती शोरुममधून कार घेताना दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत तिचे कुटुंब देखील उपस्थित असल्याचे दिसते. तसेच तिचे मोठ्या उत्साहात स्वागत केल्याचेही दिसते. रसिकाने मर्सिडीज बेंझ खरेदी केली आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी तिच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
रसिकाच्या या व्हिडीओवर भूषण प्रधान, अनघा भागरे, प्रियांका केतकरसह अनेक कलाकारांनी तिचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, रसिकाने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. तिला या मालिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. यापूर्वी तिने पोस्टर गर्ल, गॅट मॅट, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.





