अभिनेत्री जिया शंकरला दोन वर्षापासून मिळेना काम; पोस्ट शेअर करत व्यक्त केली खंत

Jiya Shankar | अभिनेत्री जिया शंकरने मालिकांसह, चित्रपट आणि वेबसिरिजमध्ये देखील काम केले आहे. काही साऊथ सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. अभिनेता रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र तिला मागील दोन वर्षांपासून कोणतेही काम मिळालेले नाही. यामुळे ती अस्वस्थ झाली असून तिने याबाबत सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत खंत व्यक्त केली आहे.
जियाने पोस्टमध्ये लिहिले की, “या आठवणीत पुन्हा रमताना मला जाणवलं की अभिनयाला सुरुवात केल्यापासून इतक्या वर्षांत माझ्यात किती संयम आणि कृतज्ञता आली आहे. इतर कलाकारांप्रमाणेच माझ्याही आयुष्यात चढउतार आले. पण गेली दोन वर्ष माझ्यासाठी कामाच्या दृष्टीने, माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने कठीण काळ होता. चित्रपट प्रदर्शित होईल याची वाट पाहत होते. पण तेही झालं नाही.” Jiya Shankar |
View this post on Instagram
“कदाचित मी यासाठी बनलेलीच नाही, कदाचित इथपर्यंतच माझा प्रवास असेल, कदाचित अभिनयाव्यतिरिक्त दुसरा पर्याय शोधायला हवा, असे कित्येक विचार मनात येऊन गेले पण इथपर्यंत पोहोचल्यानंतर एक गोष्ट मला नक्की कळली आहे ती म्हणजे कॅमेऱ्यासमोर उभं राहणं, अभिनय करणं, कुणाच्या तरी कथा सांगणं आणि त्या पात्राला स्वतःमध्ये शोधून व्यक्त करणं इतकं प्रेम मी कधीच कुणावर किंवा कशावर केलेलं नाही. यामुळे मला आत्मविश्वासापेक्षा जास्त काहीतरी मला मिळालं आहे,” असेही तिने म्हंटले आहे.
पुढे जिया म्हणाली, “ती ६ वर्षांची लाजरी, सतत टीका झालेली, त्रास सहन करणारी मुलगी आज फक्त आनंदी आहे. तिला तिचा अभिमान आहे आणि तिला माहीत आहे की काहीही झालं तरी ती ठीकच असणार आहे. मी स्वतःसाठी लढायला शिकले, स्वतःवर प्रेम करायला, स्वतःचं कौतुक करायला आणि थोडंसं का होईना, स्वतःवर संशय घेणं थांबवायला शिकले. अजून खूप प्रवास करायचा आहे पण मी फक्त आशा करू शकते. जरी इथेच सगळं थांबलं, तरीही मला समाधान आहे की मला जे करायला मनापासून आवडतं, ते करण्याची संधी मला मिळाली. मी कायमच अभिनयावर प्रेम करणारी एक मुलगी असेन”, असे म्हणत जिया शंकरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, ‘वेड’ चित्रपटाशिवाय जिया व्हर्जिन भास्कर या वेब सीरिजमध्येही झळकली आहे. तसेच ती बिग बॉस ओटीटीवरही पाहायला मिळाली. Jiya Shankar |
हेही वाचा:
Epstein Files : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा खरा ठरणार? एपस्टीन फाईल्सवरून खळबळ, दिग्गजांची नावे चर्चेत





