Anushka Sharma : अनुष्काने २९ व्या वर्षी विराटशी का केलं होतं लग्न? अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा

Anushka Sharma Reveals Reason to Marry Virat Kohli : जेव्हा जेव्हा ‘आदर्श कपल्स’चा विषय निघतो, तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं नाव सर्वप्रथम समोर येतं. त्यांच्यातील बंध, मैत्री आणि परस्पर समजूतदारपणा यामुळे ते भारतातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक मानले जातात. डिसेंबर २०१७ मध्ये या दोघांनी इटलीमध्ये गुपचूप लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता अनुष्का शर्माने विराट कोहलीशी लग्न करण्यामागील कारण स्पष्ट केलं आहे.
विराट-अनुष्काची पहिली भेट कुठं झाली होती?
अनुष्का आणि विराट यांची पहिली भेट एका जाहिरात चित्रीकरणादरम्यान झाली होती आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. अभिनेत्री अनुष्का शर्मा जेव्हा तिच्या करिअरच्या शिखरावर होती, तेव्हाच तिने विराट कोहलीशी लग्न केलं. त्या वेळी अनुष्का शर्मा २९ वर्षांची होती. सामान्यतः बॉलिवूड अभिनेत्री करिअरमुळे लवकर लग्न करण्याचं टाळतात, पण अनुष्काने या विचाराला छेद देत प्रेमाला प्राधान्य दिलं.
अनुष्काने २९ वर्षी केलं होतं लग्न –
एका मुलाखतीत अनुष्का लग्नाच्या निर्णयाबद्दल मोकळेपणाने बोलली. तिने सांगितलं की प्रेक्षक खूप समजूतदार आहेत. तुम्ही विवाहित असा किंवा आई असा याने त्यांना काही फरक पडत नाही, जोपर्यंत तुम्ही पडद्यावर चांगलं काम करत राहाल तोपर्यंत प्रेक्षक तुम्हाला पाठिंबा देत राहतील. अनुष्का म्हणाली, “मी वयाच्या २९व्या वर्षी लग्न केलं, जे या इंडस्ट्रीत कमी वय मानलं जातं, पण मी हे केलं कारण मी प्रेमात होते, आणि मी अजूनही प्रेमात आहे.”
विराट-अनुष्का आदर्श कपल का आहेत?
विराट आणि अनुष्का आज एक आदर्श कपलचे उदाहरण आहेत. त्यांची केमिस्ट्री, एकमेकांबद्दलचा आदर आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचे व्यवस्थापन यामुळे त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. त्यांच्या लग्नाला आता अनेक वर्षे झाली असून त्यांना दोन मुले आहेत. विराट आणि अनुष्का यांना सार्वजनिक ठिकाणी कमी पाहिले जात असले, तरी जेव्हा ते एकत्र दिसतात, तेव्हा सोशल मीडियावर व्हायरल होतात. विराट आणि अनुष्का यांनी त्यांच्या निर्णय आणि नात्याने हे सिद्ध केले आहे की प्रेम, करिअर आणि कुटुंब या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे संतुलित करता येऊ शकतात.





