Actor Swapnil Joshi: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याला जगभरातून कोट्यावधी भाविक उपस्थित राहत आहेत. अनेक नेते, प्रसिद्ध कलाकारांनी देखील महाकुंभ मेळ्यात हजेरी लावली. कोट्यावधी नागरिकांना महाकुंभ मेळ्यात सहभागी होऊन शाही स्नानाचा अनुभव घेतला. नुकताच मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी देखील महाकुंभ मेळ्याला पोहोचला.
महाकुंभ मेळ्यात उपस्थित राहत स्वप्नीलने शाही स्नान केले. याचा एक व्हीडिओ देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय अनुभव’ असल्याच्या भावना देखील त्याने व्यक्त केल्या.
स्वप्नील जोशीने व्हीडिओ शेअर करत लिहिले की, महाकुंभ 2025… आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय अनुभव! प्रयागराजमध्ये महाकुंभ 2025 ला उपस्थित राहण्याचा आणि महासंगमात पवित्र स्नान करण्याचा योग आला. हा दिव्य प्रवास अनुभवण्याचे भाग्य लाभले, यासाठी माझ्या भावाला सौरभ गाडगील आणि त्यांच्या परिवाराला धन्यवाद!
View this post on Instagram
कुटुंब आणि प्रियजनांसाठी प्रार्थना केली, सकारात्मक ऊर्जा आत्मसात केली, डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले! या अद्भुत महाकुंभाचे साक्षीदार होण्याचा सन्मान मिळणं, हा दैवी आशीर्वाद वाटतो—हा सनातन धर्म, मानवता, प्रेम आणि भक्तीचा सर्वात मोठा उत्सव! या क्षणाची अनुभूती शब्दांत मांडता येणार नाही—खरंच दिव्य अनुभव! हर हर गंगे! नमामि गंगे, जय हिंद! जय भारत!, अशा शब्दात स्वप्नीलने त्याचा महाकुंभमधील अनुभव शेअर केला आहे.
दरम्यान, स्वप्नीन जोशीच्या कामाबद्दल सांगायचे तर लवकरच ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसाद महादेव खांडेकर यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट 28 फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.