डीपी दादा आणि अंकिता वालावलकरच्या नवऱ्याची गट्टी जमली, लवकरच करणार एकत्र काम

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या माध्यमातून अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार हे कलाकार घराघरात पोहोचले. शो दरम्यान या दोघांच्या मैत्रीचीही विशेष चर्चा झाली. शो संपला असला तरीही हे दोघेजण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात.
काही दिवसांपूर्वीच अंकिता वालावलकरचे लग्न पार पाडले. या लग्नाला डीपी दादा अर्थात धनंजय पोवार सहकुटुंब उपस्थित होता. ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकिताने संगीतकार कुणाल भगतशी लग्न केले आहे. कुणाल व धनंजयची देखील सध्या चांगली मैत्री जमल्याचे दिसून येत असून लवकरच दोघेजण एकत्र काम करणार आहेत.
कुणाल भगतने मालिका, चित्रपटांसाठी संगीत दिले आहे. काही दिवसांपूर्वीच आलेल्या ‘येक नंबर’ चित्रपटातील त्याच्या गाण्याचेही कौतुक झाले. नुकतेच, कुणालने इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी अनेकांनी त्याला कामाबद्दल प्रश्न विचारले. धनंजय पोवारने देखील त्याला ‘प्रोजेक्ट सुरू करूया चल लवकर’ असे विचारले. यावर कुणालनेही ‘लवकरच’ असे उत्तर दिले.
यावरून आता अंकिता वालावलकरचा नवरा आणि धनंजय पोवार हे दोघे लवकरच एकत्र काम करताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हे दोघे नक्की कोणत्या प्रोजेक्टसाठी एकत्र काम करणार याबाबत मात्र माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, गेल्या महिन्यातच अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांचा कोकणात विवाह पार पडला. बिग बॉस मराठीमधील अनेकजणांनी या लग्नाला हजेरी लावली होती. धनंजय पोवार देखील सहकुटुंब या लग्नाला उपस्थित होता. यावेळी धनंजयने अंकिताचा भाऊ या नात्याने कुणालचा कानही पिळला.





