Mrunal Thakur: अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या ‘डकैत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मिश्र प्रतिसाद मिळत असतानाच मृणालने एक प्रामाणिक कबुली दिली आहे. तिने सांगितले की, इतक्या भूमिका साकारूनही तिला अनेकदा आत्मविश्वासाची कमतरता जाणवते. एका मुलाखतीत मृणाल म्हणाली की, “कधी कधी मला स्वतःबद्दल कमी आत्मविश्वास वाटतो. लोक मला सांगतात की मी माझ्या टॅलेंटला कमी लेखते, पण हे का होतं हे मला अजूनही समजलेलं नाही.” मात्र, ती या गोष्टीवर काम करत असल्याचेही तिने स्पष्ट केले. स्वतःच्या कमतरतेला स्वीकारण्यासाठी धैर्य लागते, आणि आज ती निडरपणे चुका करण्यास तयार असल्याचेही तिने सांगितले. मृणालने तिच्या स्वप्नांबद्दल बोलताना सांगितले की, तिला नंबर वन अभिनेत्री बनण्याचा दबाव नाही. तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगलं काम आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं आहे. “मला आजच्या पिढीतील उत्तम अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळख मिळवायची आहे. मी आनंदाने काम करत राहायचं आहे आणि नवीन गोष्टी शिकत राहायचं आहे,” असे ती म्हणाली. Mrunal Thakur चित्रपटांच्या निवडीबाबत बोलताना मृणालने सांगितले की, ती नेहमी विषयप्रधान आणि कमर्शियल सिनेमामध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करते. तिच्या मते, काही विषयप्रधान चित्रपट खूप चांगले असतात, पण त्यांना अपेक्षित व्यावसायिक यश मिळत नाही. त्यामुळे भूमिका निवडताना खूप विचार करावा लागतो. “मी कोणताही रोल फक्त लोकांच्या अपेक्षेमुळे करत नाही. मला तो रोल आवडला तरच मी तो स्वीकारते,” असे ती स्पष्टपणे म्हणाली. मृणालने स्वतःला अजूनही शिकणारी आणि विकसित होणारी कलाकार म्हणून वर्णन केले. ती म्हणाली की, “मी अजूनही स्वतःला शोधत आहे. रोज काहीतरी नवीन शिकत आहे आणि चुका करत पुढे जात आहे.” तिला अशा दिग्दर्शकांसोबत काम करायचे आहे जे तिच्यातील खरी क्षमता ओळखून तिला अधिक चांगलं घडवू शकतील. तिच्या मते, तिला केवळ ‘हीरोइन’ म्हणून नव्हे, तर कथेला पुढे नेणाऱ्या महत्त्वाच्या पात्राच्या रूपात पाहिले जावे. ती आयुष्याच्या शेवटपर्यंत अभिनय करत राहण्याची इच्छा व्यक्त करते आणि म्हणते की, “ही स्पर्धा किंवा नंबर वन होण्याची शर्यत माझ्यासाठी महत्त्वाची नाही.” वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ‘डकैत’मध्ये ती अदिवी शेष सोबत दिसत आहे. याशिवाय ती ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटात वरुण धवन आणि पूजा हेगडे सोबत झळकणार आहे. तसेच ती अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक अॅटली यांच्या ‘राका’ या मोठ्या प्रोजेक्टचाही भाग आहे.