भारतीय सिनेसृष्टीला धक्का; ‘सराभाई व्हर्सेस सराभाई’ फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन

Actor Satish Shah passes away : भारतीय मनोरंजनसृष्टीला आज आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूड आणि मराठी सिनेमात आपल्या अविस्मरणीय अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं आज (२५ ऑक्टोबर) दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये निधन झालं.
त्यांचं वय ७४ वर्षं होतं. किडनी फेल्युअरमुळे त्यांची तब्येत गेल्या काही दिवसांत बिघडली होती आणि नुकतेच त्यांना किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया झाली होती. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून आहे. सतीश शाह यांचे मित्र आणि उद्योगसंबंधित अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून ही दुःखद बातमी जाहीर केली.
अशोक पंडित यांचं दु:ख व्यक्त करणारं संदेश
अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं, “नमस्कार, मी अत्यंत दुःखद बातमी सांगतोय. माझे मित्र आणि उत्तम कलाकार सतीश शाह यांचं निधन झालं. किडनी फेल्युअरमुळे त्यांची तब्येत बिघडली. त्यांना हिंदुजा हॉस्पिटलला नेण्यात आलं, पण तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बांद्रा येथील कलानगरमधील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन ठेवण्यात येईल. त्यानंतर रविवारी (२६ ऑक्टोबर) अंत्यसंस्कार होतील. इंडस्ट्रीसाठी हे मोठं नुकसान आहे. ओम शांती.”
हास्य आणि अभिनयाचा राजा
सतीश रवीलाल शाह यांचा जन्म २५ जून १९५१ रोजी मुंबईत झाला. कच्छी गुजराती कुटुंबातून असलेले शाह यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण घेतलं आणि नंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात (FTII) प्रशिक्षण घेतलं.
४० वर्षांच्या दीर्घ करिअरमध्ये त्यांनी २५० हून अधिक चित्रपट आणि अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं. त्यांचा कॉमेडी टायमिंग आणि मिमिक्री स्किल्स यामुळे ते ‘कॉमेडी किंग’ म्हणून ओळखले जात होते. त्यांनी ५५ वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या, ज्यामुळे प्रेक्षक त्यांच्या प्रत्येक भूमिकेला ओळखत असत.

