Makarand Anaspure : शनिशिंगणापूर येथे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी घेतले सपत्नीक शनिदर्शन

नेवासा :मराठी चित्रपट सुष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचा अभिषेक घालून सपत्नीक शनीदेवाचे दर्शन घेतले.
यावेळी शनिशिंगणापूर येथील दर्शन प्रसंगी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी शिल्पा अनासपुरे, चिरंजीव केशव अनासपुरे, मुलगी इंद्रायणी नेवासा तालुक्यातील आदर्श गाव गोगलगावचे माजी सरपंच योगेश म्हस्के, डॉ.आरले, अनिल वाघ, निलेश टेमक, राजू फोके उपस्थित होते.
शनिवारी आलेली भागवत एकादशी यादिवशी दर्शनाचे भाग्य मला लाभले. शनिदेवाला घातलेल्या अभिषेकाने व दर्शनाने आत्मिक समाधान व एक ऊर्जा प्राप्त झाली असल्याचे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दर्शन झाल्यानंतर सांगितले. यावेळी श्री शनैश्वर देवस्थानच्या वतीने अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा श्रीफळ प्रसाद व शनिदेवाची शाल देऊन सन्मान करण्यात आला.
जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे या जोडीने नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून उपेक्षित घटकाला न्याय देऊन पुण्याचे कार्य हाती घेतले असून, त्यांच्या या कार्याला बळ मिळावे असे साकडे युवा नेते योगेश म्हस्के यांनी दर्शन प्रसंगी शनीदेवाला घातले.





