Nagar | खाजगी वाहनांवर पोलीस, महाराष्ट्र शासन लिहले तर होणार कारवाई!

नगर, (प्रतिनिधी) – कर्तव्यावर असताना ‘खाकी’चा रूबाब दाखवणारे काही पोलीस खासगी वाहनांतून फिरताना ‘पोलीस’ असा फलक गाडीवर लावून फिरताना दिसतात. परंतु खासगी वाहनातून फिरताना ‘पोलीस’ असल्याचे स्टीकर, प्लेट किंवा बोधचिन्ह लावून फिरता येणार नाही.
याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आदेश काढले आहेत. त्याचबरोबर खासगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’, तसेच इतर दादा, मामा, काका, भाऊ, असेही लिहिता येत नाही, अशा वाहनांवर ही कारवाई करण्यात येणार आहे.
पोलीस दलाच्या गाडीतून फिरताना पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा एक वेगळा रूबाब असतो. त्यांना मान, सन्मान मिळतो; परंतु पोलीस कर्तव्यावरून उतरल्यानंतर खासगी जीवनात वावरतानाही पोलिसांना ‘खाकी’ची नशा सोडवणे कठीण जाते.
खासगी जीवनातदेखील आपल्याला तोच मान सन्मान मिळावा, अशी अनेकांना अपेक्षा असते. कुटुंबासमवेत किंवा स्वत: खासगी कामानिमित्त गाडीतून जाताना आपल्याला कोणी अडवू नये, कोणीही कागदपत्रांची विचारणा करू नये, असे वाटत असते.
सोडून अन्य जिल्ह्यांत गेल्यानंतर तसेच अन्य राज्यांत गेल्यानंतरही आपण पोलीस असल्यामुळे अडवले जाऊ नये, असे वाटते. त्यामुळे अनेकजण खासगी गाडीवर पोलीस असल्याचे स्टीकर लावतात.
काही जण पुढच्या भागात काचेजवळ पोलीस असल्याचा छोटा फलक दिसेल, असा ठेवतात. काही जण गाडीवर थेट बोधचिन्हही वापरतात. परंतु मोटार वाहन अधिनियमानुसार, असे लिहिता येत नाही. याबाबत पूर्वीही परिवहन विभागाने निर्देश दिले आहेत.
एक तक्रारदाराने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी खासगी वाहनांवर पोलीस बोधचिन्ह तसेच पोलीस लिहिणार्यांवर कारवाई करण्याबाबत तक्रार केली. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने तक्रारीची दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
‘महाराष्ट्र शासन’ लिहिल्यास कारवाई खासगी वाहनांवर पोलीस बोधचिन्ह तसेच पोलीस लिहिता येत नाही. त्याचबरोबर खासगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’ असेही लिहिता येत नाही.
त्यामुळे ‘पोलीस’ आणि ‘शासन’ असे लिहिणार्या वाहनांवर मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक यांनी कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.
मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्याही खाजगी वाहनांवर, पोलीस, महाराष्ट्र शासन, तसेच दादा, मामा, काका, भाऊ लिहणे हे बेकायदेशिर आहे. लवकरच याबाबत कारवाईची मोहिम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खासगी वाहनांवर नावे काढून टाकावी. विनोद सगरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नगर.





