Nana Kate : धरण भरले, पाणी कपात रद्द करा; माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे यांची आयुक्तांकडे मागणी
Nana Kate : 'पूर्ववत नियमित, सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करा'

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण सुमारे ९५ टक्के भरले असून धरणातून पाण्याचा विसर्गही सुरू झाला आहे. यामुळे शहरावर लादण्यात आलेली १५ टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी ८ जुलै २०२६ रोजी धरणात ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असतानाच पाणी कपात रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. आता धरण जवळपास पूर्ण भरलेले असूनही शहरातील अनेक भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे.
पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना कृत्रिम पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे शहरावरील १५ टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करून पूर्ववत नियमित, सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.
Bhosari MIDC: भोसरी एमआयडीसीत वाढत्या चोर्या; अपुरी प्रकाशव्यवस्था आणि महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर





