पुणे जिल्हा | केसनंद रोडवरील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई

वाघोली, (प्रतिनिधी)- महानगरपालिका नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या वाघोली- केसनंद रस्त्यावर आकाशचिन्ह विभागाकडून कोणती परवानगी न घेता अनधिकृत लावलेल्या होर्डिंगवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी परवाना निरीक्षक हाशम पटेल यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार गगन ग्लोबल डेव्हलपर्सचे मोहित गोयल यांच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व होर्डिंग्जची पाहणी करण्यात येत असून परवानगी दिलेल्या होर्डिंगपासून कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी देखील उपाययोजना करण्यात येत आहेत. अनधिकृत होर्डिंग्जवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सोमनाथ बनकर, सहाय्यक आयुक्त, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय पुणे.





