कोल्हापुरात अजित पवार गटातील नेत्याच्या साखर कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाने केली ‘ही’ कारवाई

कोल्हापूर : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटातील माजी आमदार के.पी. पाटील यांच्या कोल्हापुरातील बिद्री साखर कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारखान्याचा डिस्टलरी प्रकल्पाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आल्याचा पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.
12 कोटींचा महसूल बुडवल्याचा आरोप
अतिरिक्त मद्यार्कसाठा आढळून आल्याचा ठपका यात ठेवण्यात आला आहे. तसेच 12 कोटींचा महसूलदेखील बुडवण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील आणि विद्यमान शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्यात या कारखान्यावरून संघर्ष आहे. दोघेही महायुतीत असल्याने उमेदवारीवरून त्या ठिकाणचे वातावरण तापले आहे.
के. पी. पाटील यांनी दिले महायुती सोडण्याचे संकेत
बिद्री कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केल्याने के पी पाटील आक्रमक झाले आहे. लवकरच मेळावा घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचं ते म्हणाले. यापूर्वीही माझ्यावर असा प्रसंग आला होता. जनतेचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. माझा पक्ष आणि चिन्ह जनता आहे, असं सांगत त्यांनी महायुती सोडण्याचे संकेत दिले आहेत.





