पिवळी रेषा रेखांकन न करणाऱ्या शाळांवर कारवाई : डॉ. विश्वजीत कदम

मुंबई – केंद्र शासनाच्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायदा (कोटपा)-2003 ची राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत आह. या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्डच्या परिसरामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, उत्पादन, वितरण, साठवण करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसे सर्व शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड परिसरामध्ये पिवळी रेषा रेखांकित केली जात असून ज्या शाळा पिवळी रेषा रेखांकित करणार नाही, अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी विधानसभेत सांगितले.
यासंदर्भात अतुल भातखळकर, योगेश सागर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. याला उत्तर देताना डॉ. कदम म्हणाले, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्स यांनी केलेल्या जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण 2019च्या चौथ्या फेरीमध्ये देशात 13 ते 15 वयोगटातील बालकांचे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण 5.1 टक्के असल्याचे आढळून आले आहे.
गेल्या 10 वर्षांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण 42 टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले आहे. राज्यात 18 वर्षांखालील मुले आणि 18 वर्षांवरील व्यक्तींना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन लागू नये यासाठी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायदा (कोटपा)-2003 ची राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत आहे.





