CM Yogi Adityanath: “सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी दिली तर थेट कारवाई, रस्त्यावरील नमाज पठणावरही बंदी” ; ईदसाठी योगी सरकारची नियमावली
CM Yogi Adityanath: “बकरी ईदच्या काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास पूर्णपणे बंदी असेल. तसेच, कोणत्याही परिस्थितीत रस्ते अडवून नमाज पठण करता येणार नाही,” असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

CM Yogi Adityanath: उत्तर प्रदेशात योगी सरकारने आगामी बकरी ईद सणानिमित्त नुकतीच एका उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. या बिथकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि प्रशासकीय तयारीचा आढावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला.
दरम्यान, या बैठकीत आगामी बकरी ईद शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करून साजरी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला अत्यंत कडक निर्देश दिले आहेत. “बकरी ईदच्या काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास पूर्णपणे बंदी असेल. तसेच, कोणत्याही परिस्थितीत रस्ते अडवून नमाज पठण करता येणार नाही,” असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
या बैठकीत केवळ सण-उत्सवांची तयारीच नाही, तर जनतेच्या तक्रारींचे निवारण, गंगा दसरा आणि बेकायदेशीर कामांविरोधातील कारवाई अशा अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
प्रतिबंधित प्राण्यांच्या कुर्बानीवर पूर्णपणे बंदी (CM Yogi Adityanath)
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या बैठकीत, बंदी असलेल्या प्राण्यांची कुर्बानी देणाऱ्यांवर ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत कठोर कारवाई केली जाईल.” असे आदेश दिले आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाने केवळ आधीपासून निश्चित केलेल्या ठिकाणीच कुर्बानी देण्याची परवानगी द्यावी.
कोणत्याही नवीन परंपरेला किंवा पद्धतीला परवानगी दिली जाणार नाही. नमाज पठण केवळ पारंपरिक आणि निश्चित केलेल्या धार्मिक स्थळांवरच केले जावे. रस्त्यांवर रहदारी रोखून नमाज पठण करण्यास सक्त मनाई असेल.” असेही सांगण्यात आले आहे.
स्वच्छता आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
सण साजरा करताना नागरिकांना त्रास होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत
* कुर्बानीनंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची आणि अवशेषांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली पाहिजे.
* उघड्यावर मांस विक्री करण्यास सक्त मनाई असेल. तसेच, बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कडक कारवाई केली जाईल. अधिकृत कत्तलखान्यांमध्येही क्षमतेपेक्षा जास्त प्राणी ठेवता येणार नाहीत.
* संवेदनशील भागांत तात्काळ ‘फ्लॅग मार्च’ सुरू करावा. धार्मिक स्थळांच्या परिसरात पायी गस्त वाढवण्यात यावी. वीज आणि पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले.
* अलिगड, बिजनोर, सहारनपूर, रामपूर आणि संभल या संवेदनशील जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी जुन्या घटनांचा अभ्यास करून संभाव्य समाजकंटकांवर आधीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्र्यांनी आणखी काही महत्त्वाचे आदेश दिले (CM Yogi Adityanath)
* बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन केला जाईल.
* भूमाफियांवर कठोर कारवाई करताना कोणत्याही निष्पाप नागरिकाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.
* नंबर प्लेट नसलेल्या वाहनांविरोधात संपूर्ण राज्यात विशेष मोहीम राबवली जाईल.






