नगर | मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

राजूर, (वार्ताहर)- महागड्या मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यास राजूर पोलिसांना यश आले. त्याच्याकडून १० लाख ८० हजार रुपये किमतीच्या दहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
राजूर, शेंडी व अन्य ठिकाणच्या मोटरसायकली या चोरी गेलेल्या असताना राजूर व शेंडी गावातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीनुसार पोलीस पथक घोटी येथे तपासणीसाठी गेले होते. गुन्ह्यातील संशयित शंकर एकनाथ गांगड (रा. उबाडे, ता.इगतपुरी) या ताब्यात घेऊन त्यास पोलिसांचा खाक्या दाखवल्यानंतर त्याने राजूर, शेंडी येथील दोन बुलेट त्याच्या साथीदारासोबत येऊन चोरी केल्याची कबुली दिली.
दोन्ही बुलेटआरोपींकडून जप्त करण्यात आल्या. त्याने इतर पोलीस स्टेशन हद्दीतील मोटर सायकल चोरी केलेबाबतची माहिती दिली. त्यावरून त्याच्याकडून दहा मोटरसायकली, अशा एकूण दहा लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने राजूर, शहापूर, अंबड पोलीस स्टेशन हद्दीमधून या गाड्या चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. राजूर येथील चंद्रकांत भडांगे व भंडारा येथील संतोष पवार यांच्या मालकीच्या बुलेट मोटरसायकली चोरीस गेल्या होत्या, मात्र दोन महिन्यांनी त्यांच्या बुलेट राजूर पोलिसांनी परत मिळवून दिल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.





