Pune : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीचा सोलापूर, अहिल्यानगर बस स्थानकातही वावर; पोलीस तपासात नवी माहिती समोर

पुणेः स्वारगेट बसस्थानकात एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याच्या गुन्ह्याखाली आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गाडेला पोलिसांनी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्वारगेट पोलीस या घटनेचा तपास वेगाने करत आहेत. आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा अहिल्यानगर, सोलापूर तसेच पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर, शिरूर एसटी स्थानकात वावर असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. गेल्या दोन वर्षांतील त्याच्या ठावठिकाण्याची माहिती घेतल्यानंतर त्यामधून केलेल्या विश्लेषणातून ही माहिती पोलिसांनी मिळाली आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. त्यानुसार गुन्हे शाखा गाडेचा ताबा लवकरच स्वारगेट पोलिसांकडून घेणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाडेला स्वारगेट पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती.
तसेच २०१९ मध्ये गाडेने पुणे ग्रामीण, अहिल्यानगर परिसरातून ज्येष्ठ महिलांना सोडण्याच्या बहाण्याने लुटण्याचे गुन्हा केला होता. गाडेचा मोबाईल अजून पोलिसांनी मिळालेला नाही. मात्र, पोलिसांकडून त्याच्या मोबाईचा शोध घेण्यात येत आहे. त्याचा मोबाईल मिळाल्यानंतर पोलीस त्या मोबाईचे तांत्रिक विश्लेषण करणार असल्याचे समजते. त्यानंतर त्यामधून आणखी माहिती समोर येईल, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
गाडेचा सर्वाधिक वावर हा स्वारगेट बसस्थानकात
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच त्याच्या विरुद्ध सबळ पुराव्यासाठी पोलिस तपास करत आहेत. हा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या तपासात आरोपी दत्ता गाडेचा सर्वाधिक वावर हा स्वारगेट बसस्थानकात असल्याचे समोर आले आहे.





