स्वारगेट प्रकरणातील आरोपी सापडेना; 25 एकर शेताची पाहणी करून पोलिसांचे पथक परतले

Pune Crime: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. दत्तात्रय गाडे असे नराधमाचे नाव आहे. हा आरोपी पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवाशी असून पोलिसांना या आरोपीसंदर्भात मोठी माहिती हाती लागली होती. आरोपी काल रात्री पुण्यातील गुनाट गावात आल्याची माहिती समोर आली.
गुनाट गावातील घरात आरोपी दत्तात्रय गाडेने पाणी मागितले, अशी माहिती पुण्यातील शिरूर येथील गुनाट गावातील गावकऱ्यांनी दिली. गुनाट गावातील गावकऱ्यांकडून मिळालेल्या या माहितीनंतर पोलिसांकडून गुनाट गावात आरोपीचा कसून शोध घेण्याची मोहीम सुरू झाली. पोलिसांचा फौजफाटा गुनाट गावात दाखल झाला. गावात असणाऱ्या ऊसाच्या शेतामध्ये ड्रोन आणि डॉग स्कॉडच्या मदतीने आरोपीचा घेण्यात आला. मात्र दिवसभर पोलिसांनी सर्व परिसर पालथा घातला मात्र आरोपीचा शोध लागला नाही.
दरम्यान, गुनाट गावातील आरोपी दत्ता गाडेला शोधण्याची आजच्या दिवसाची शोध मोहीम थांबविण्यात आली आहे. उद्या सकाळपासून पुन्हा शोध मोहिमेला सुरुवात होणार आहे. पुणे पोलिसांनी ग्रामस्थांना देखील रात्रीच्या वेळी आरोपी दिसला तर कळवण्याचे आहवान केले आहे.
25 एकर परिसरात केली पाहणी –
दत्ता गाडेला शोधण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी गुनाट गावच्या परिसरातील गाडे ज्या शेतात असल्याची माहिती मिळाली होती तेथील 25 एकर परिसरातील शेतशिवाराची पहाणी केली. मात्र तरीही दत्ता गाडेचा शोध लागला नसल्याने शोध पथकाला परत येण्याच्या सुचना देण्यात आले आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे रात्रीची शोधमोहिम थांबविण्य़ात आली आहे.
दत्तात्रय गाडेवर 1 लाखाचे बक्षीस –
फरार आरोपी दत्तात्रय गाडेला पकडण्यासाठी पोलिसांनी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. नागरिकांनी कुठल्याही संशयित हालचाली आढळल्यास स्वारगेट पोलिस ठाण्याशी किंवा 100 क्रमांकावर संपर्क साधावा, अशा सूचनाही देण्यात आली आहे. आरोपीबद्दल माहिती सांगणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.






