पुण्यातील फसवणूकबाज अखेर जाळ्यात, १२ वर्षांत ४ राज्यांतील १० हुन अधिक गुन्ह्यांचा पर्दाफाश

पुणे : पुण्यातील कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करून जामिनावर सुटलेल्या आरोपीने मागील बारा वर्षांत चार राज्यांमध्ये दहा पेक्षा जास्त गुन्हे केले होते. विशेष म्हणजे या काळात त्याने तब्बल १५ बनावट ओळखी तयार केल्या होत्या. अखेर एका न्यूज चॅनलवरील बातमीमुळे त्याचा छडा लागला आणि त्याला गोव्याच्या कारागृहातून पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले.
साहिलअली मोहम्मदअली खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर पुण्यात २०१२ मध्ये दाखल झालेल्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी प्रोडक्शन वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र, तो न्यायालयात हजर होत नसल्याने पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत होता.
खेड-शिवापूर येथील रहिवासी व हॉटेल व्यावसायिक संजय विठ्ठलराव कोंडे देशमुख यांनी २०१२ मध्ये सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपीने स्वत:ला बिल्डर व डेव्हलपर म्हणून भासवत भूखंड गुंतवणुकीचे आमिष दाखवले. साथीदारांसह बनावट कागदपत्रे तयार करून ५२ लाख रुपयांची फसवणूक केली. यासाठी त्याने बोगस फर्म्स, खोटी बँक खाती आणि बनावट सिमकार्ड्सचा वापर केला.
अटक झाल्यानंतर आरोपीला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. शंभर दिवसांनी तो जामिनावर बाहेर आला, मात्र त्यानंतर न्यायालयाच्या तारखांना अनुपस्थित राहिला. मागील बारा वर्षांपासून कोंडे देशमुख सातत्याने पाठपुरावा करत होते.
अखेर एका दिवशी त्यांनी एका न्यूज चॅनलवर गोव्यातील एका आर्थिक गुन्ह्याची बातमी पाहिली. छायाचित्र पाहून त्यांनी आरोपीची ओळख पटवली. जरी नाव वेगळं दिसत असलं, तरी चेहरा ओळखीचा वाटल्याने त्यांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधला. खात्री झाल्यानंतर आरोपीला पुण्यात न्यायालयात हजर करण्यात आले.
सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी सांगितले की, आरोपीवर गोवा, हैदराबाद, दिल्ली आणि महाराष्ट्रात दहा पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. यामध्ये ‘बॉडी ऑफेन्स’ व फसवणुकीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. सध्या तो पणजी कारागृहात शिक्षा भोगत आहे.





