Shirur : गावठी पिस्तूल अन् जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद
Shirur : २७ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १०.५० वाजण्याच्या सुमारास शिरूर पोलिसांचे डी.बी. पथक शहरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोलीस अंमलदार बालाजी मोटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत रेणुकामाता मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत एक इसम गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

शिरूर : शिरूर शहरातील रेणुकामाता मंदिर परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बेकायदेशीररीत्या जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने बेड्या ठोकल्या. गणेश राम गव्हाणे (वय ३३, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईत पोलीस अंमलदार बालाजी मोटे यांनी गोपनीय बातमीदारामार्फत मिळविलेली अचूक माहिती महत्त्वपूर्ण ठरली.
२७ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १०.५० वाजण्याच्या सुमारास शिरूर पोलिसांचे डी.बी. पथक शहरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोलीस अंमलदार बालाजी मोटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत रेणुकामाता मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत एक इसम गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी तातडीने ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग यांनी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या परवानगीने पोलीस पथक व पंचांसह घटनास्थळी धाव घेतली. तेथे संशयास्पदरीत्या आढळलेल्या गणेश गव्हाणे याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता कमरेला गावठी पिस्तूल आणि त्यामध्ये एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद खींग करीत आहेत.
बालाजी मोटे यांच्या अचूक माहितीमुळे कारवाईला यश!
गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळविणे आणि ती तातडीने वरिष्ठांपर्यंत पोहोचविणे, या कामात पोलीस अंमलदार बालाजी मोटे यांनी दाखविलेली तत्परता या कारवाईत निर्णायक ठरली. त्यांच्या सतर्कतेमुळे गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यामुळे डी.बी. पथकाच्या या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग, पोलीस अंमलदार नितेश थोरात, बालाजी मोटे, संदीप खेडकर, राहुल वाघमोडे, विजय शिंदे, अर्जुन भालसिंग, अजय पाटील आणि अंबादास थोरे यांचा समावेश होता.





