Accidents : महापालिकेकडून शहरातील हाॅटेलचा ओला कचरा संकलन तसेच घरोघरी कचरा संकलित झाल्यानंतर तो कचरा हस्तांतरण केंद्रावरून कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या डंपरमधून नेला जातो. मात्र, या डंपरमधून या कचऱ्यात असलेले तेलाचे पाणी तसेच कुजलेल्या कचऱ्यामधून निघणारे लिचेट रस्त्यावर पडत असल्याने, वाहने घसरण्याचे प्रकार लक्षणीय प्रमाणात वाढले असून महापालिका प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याचा सर्वाधिक त्रास पौड रस्त्याने शहरात येताना कोथरूड कचरा डेपोच्या समोरील बाजूच्या मुख्य रस्त्यावर होत आहे. या ठिकाणी ओला कचरा असलेली वाहने थांबत असल्याने त्यांचे लिचेट रस्त्यावर येत असून वाहने घसरत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महापालिकेकडून कचरा वाहतूक करताना ती बंदिस्त वाहतून तसेच लिचेट आणि कचऱ्याचे पाणी रस्त्यावर येणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र, अनेकदा वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये हा ओला कचरा बायोडीग्रेडेबल पिशव्यांमध्ये न भरता थेट वाहनात टाकला जातो. परिणामी या कचऱ्यात असलेले पाणी तसेच तेल एकत्र होऊन ते वाहतुकीच्या वाहनातून रस्त्यावर पडत असून, रस्ता निसरडा होत आहे. तर, त्यावरून दुचाकी वाहने घसरल्याने नागरिकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. ‘पौड रस्त्याच्या समोर कचरा डेपोच्या परिसरात महापालिकेची ओल्या कचऱ्याची वाहने रस्त्यावरच असतात त्यातून मोठ्या प्रमाणात लिचेट पडते. त्यातच, शहरातून जातानाही हे लिचेट रस्त्यावर सांडते. अशा वेळी त्यावरून वाहने घसरतात. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार केली आहे. मात्र, काहीच होत नाही. आता असे लिचेट रस्त्यावर पडल्यावर अग्नीशमनदलास फोन केल्यानंतर दिवसभर हे प्रकार होत असल्याने दिवसभर रस्ता साफ करण्यासाठी थांबायचे का? असा सवाल तेच आम्हाला करतात’ – प्रशांत कनोजीया ( मनसे पदाधिकारी) ‘ओला कचरा बंदिस्त पद्धतीने घेऊन जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, हस्तांतरण करताना तो व्यवस्थित केला जाईल, रिकाम्या वाहनात कचरा राहणार नाही यासाठी सूचना देण्यात येतील. तसेच, वाहनातील पाणी नितळेपर्यंत ती जागेवरच थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’ – अविनाश संकपाळ (उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन) Dilip Walse Patil : अध्यात्माच्या नावाखाली कर्मकांड करू नये : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील