कामशेत घाटात अपघातांचे सत्र कायम

कामशेत : जुना पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेत घाटामध्ये गेल्या काही वर्षांपासून अपघातांची मालिका सुरू आहे. लहान-मोठ्या अपघातांची संख्या चिंताजनक आहे. तर गेल्या तीन वर्षांत येथे २१ गंभीर अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये तब्बल १२ जणांनी प्राण गमावले असून, १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या मार्गावर तीव्र उतार आणि धोकादायक वळणांमुळे वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते आणि अपघात होतात. केवळ नागरिकांनीच नव्हे तर पोलिसांनी देखील दहा वेळा याबाबत संबंधित विभागाला पत्र पाठविले आहे. तरी देखील प्रशासन ढिम्म आहे.
कामशेत घाट हा दर्शन धाब्यापासून जय मल्हार हॉटेलपर्यंत पसरलेला असून या संपूर्ण मार्गावर अनेक धोकादायक वळणे आहेत. विशेषतः घाटात पुढील रस्ता स्पष्ट न दिसल्यामुळे अचानकपणे वळणांवर वाहनांचे नियंत्रण सुटते. स्थानिक नागरिकांनी घाटाचा मार्ग बदलून सरळ किंवा भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी केली आहे.
अपघातांची गंभीरता लक्षात घेता, घाटाच्या सुरक्षेसाठी त्वरीत उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कामशेत घाट अपघातांसाठी कुप्रसिद्ध ठरत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. यावर त्वरित उपाययोजना करून या रस्त्याला सुरक्षित बनवणे हेच आता काळाचे गडद सावट टाळण्यासाठी आवश्यक ठरत आहे.
दिशाफलक झाडाझुडपांमध्ये
घाटात अपघात होऊ नयेत म्हणून एमएसआरडीसीकडून दिशाफलक लावण्यात आले असले तरी ते झाडाझुडपांमध्ये लपल्यामुळे वाहनचालकांना दिसत नाहीत. या मार्गावरून दररोज शेकडो वाहनचालक प्रवास करतात आणि टोलही वसूल केला जातो. मात्र अपघात टाळण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
या घाटामध्ये अपघात नेहमीचे झाले असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. रस्ता फोडून सरळ किंवा भुयारी मार्ग करावा, तसेच स्पष्ट दिशा फलक व रिफ्लेक्टिव्ह लावले पाहिजेत.
– निलेश दाभाडे, स्थानिक नागरिक
या घाटातून जाताना नेहमी भीती वाटते. घाटाचा तीव्र उतार आणि वळणांमुळे गाडी दुसऱ्या लेनवर जाऊन थेट अपघात घडतो. कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
– विशाल वाघमारे, वाहनचालक
या भागाला ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्यात आले असून, एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. आजपर्यंत १० वेळा पत्रव्यवहार झाला आहे.
– रवींद्र पाटील, पोलीस निरीक्षक कामशेत





