Samruddhi Mahamarg : ऐन दिवाळीत समृद्धी महामार्गावर अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

बुलढाणा- समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका अद्यापही कायम आहे. आरटीओकडून वारंवार सूचना करूनदेखील समृद्धी महामार्गावरील प्रवासासाठी दिल्या गेलेल्या सूचना चालक पाळत नाहीत आणि यामुळे अपघातांच्या घटना घडत आहेत.
गुरुवारी सकाळी झालेल्या अपघात चालकाच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचे समोर आले आहे. टायरमधील हवा चेक करण्यासाठी खाली उतरलेल्या चालकाला ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील एका प्रवाशाची मृत्यू झाला आहे.
गणराज ट्रॅव्हल्सची बस क्रमांक एमएच 14 एचजी 5999 ही मुंबईवरून नागपूरला जात होती. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नजीक बसच्या टायरची हवा तपासण्याकरता चालक बसमधून खाली उतरला. याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने डब्लूबी 23 ई 0803 खासगी ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली.
यात बसचालक जागीच ठार झाला असून बसमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. या बसमधून एकूण 37 प्रवासी प्रवास करत होते. सदर अपघाताची घटना गुरुवारी पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली.





