पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात

मोटारीवर बस आदळून दोघांचा मृत्यू

सोमाटणे – टायर फुटल्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या नादुरुस्त मोटारीवर आराम बस (लक्‍झरी) आदळून झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये संचेती हॉस्पिटलमधील स्पाइन सर्जनचा समावेश आहे. तर मोटारीतील अन्य दोघे जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सोमाटणे गावच्या हद्दीत रविवारी (दि. 15) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर (वय 44, रा. अशोकनगर, पुणे), मोटार चालक ज्ञानेश्‍वर विलास भोसले (वय 24, रा. कात्रज, पुणे, मूळ रा. तलमोड, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. डॉ. केतन खुर्जेकर हे पुण्यातील संचेती हॉस्पिटलमधील स्पाईन सर्जन होते. तर डॉ. जयेश बाळासाहेब पवार व डॉ. प्रमोद भिल्लारे (दोघेही रा. पुणे) हे अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथे मेडिकल कॉन्फरन्समध्ये ऑपरेशन प्रेझेंटेशन अटोपल्यानंतर मोटारीने (एम. एच. 14 जी.यू.1158) डॉ. खुर्जेकर यांची टीम मुंबईला गेली होती. सायंकाळी ते पुण्याच्या दिशेने निघाले. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून पुण्याकडे डॉ. केतन खुर्जेकर यांच्यासह डॉ. जयेश पवार, डॉ. प्रमोद भिल्लारे परतत होते. उर्से टोल नाक्‍यापासून जवळच असलेल्या सोमाटणे गावाच्या हद्दीत कि.मी. 88/500 येथे आली असता मोटारीचा मागील टायर पंक्‍चर झाला. चालकाने मोटार रस्त्याच्या कडेला उभी केली. मोटार कडेला घेऊन चालक भोसले हा टायर बदलत होता. त्याला मदत करण्यासाठी डॉ. खुर्जेकर हे त्याच्या शेजारी उभे होते. तर डॉ. जयेश पवार आणि डॉ. प्रमोद भिल्लारे हे दोघे मागच्या बाजूला उभे होते.

त्याचवेळी मुंबईहून पुण्याच्या दिशेने वेगाने जाणारी भरधाव आराम बस (के. ए. 56 2555) आली. तिने रस्त्यालगत थांबलेल्या मोटरीसह चौघांना उडविले. या अपघातात चालक ज्ञानेश्‍वर भोसले व त्यांना मदत करणारे डॉ. केतन खुर्जेकर हे जागीच ठार झाले. तर अपघातात डॉ. जयेश पवार व डॉ. प्रमोद भिल्लारे हे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आराम बसची (लक्‍झरी) बसची धडक एवढी जोरात होती की यामध्ये मोटारीचा चक्‍काचूर झाला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी भेट देऊन पहाणी केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बी. सी. गावित तपास करीत आहेत. दरम्यान, मेडिकल कॉन्फरन्समध्ये डॉ. केतन खुर्जेकर व दोन निवासी डॉक्‍टर जयेश पवार आणि प्रमोद भिल्लारे अशी टीम मुंबईत ऑपरेशनचे प्रेझेंटेशन करण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. डॉ. केतन हे संचेती हॉस्पिटलचे अस्तिरोग विभागाचे प्रमुख व ज्येष्ठ विधिज्ञ श्रीपाद खुर्जेकर यांचा मुलगा होत.

डॉ. खुर्जेकर हे माझ्या लहान भावासारखे होते आणि त्यांच्या जाण्याने वैयक्‍तिक दु:ख झाले आहे. तसेच, वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. डॉ. खुर्जेकर हे निष्णात मणकाविकार तज्ज्ञ होते. डॉ. खुर्जेकरांनी आतापर्यंत 10 हजारांहून अधिक शस्रक्रिया केल्या आहेत व अनेक रुग्णांना आपल्या कौशल्याद्वारे बरे केले आहे.

– डॉ. पराग संचेती, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, संचेती हॉस्पिटल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)