वायनाडला जाणाऱ्या केरळच्या आरोग्यमंत्र्यांच्या कारला अपघात; रुग्णालयात दाखल

Kerala Health Minister Accident| केरळच्या वायनाडमध्ये काल झालेल्या भूस्खलनाने मोठी हानी केली आहे. आतापर्यंत 151 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक लोक बेपत्ता झाल्याचे म्हटले जात आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येतंय. मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे वायनाडमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. या घटनेनंतर वायनाडला जात असताना केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या कारला बुधवारी अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
वीणा जॉर्ज यांनी मंगळवारी (३० जुलै) आरोग्य विभाग संचालनालयाला भेट देऊन भूस्खलनाबाबत सुरू असलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. केरळच्या आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयानुसार, त्यांनी सद्यस्थितीची माहिती दिली आणि बाधित भागात उपस्थित असलेल्या रुग्णालयांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. गरज पडल्यास तात्पुरते रुग्णालय सुरू करण्याची शिफारसही आरोग्यमंत्र्यांनी केली. मात्र यानंतर भूस्खलनग्रस्त वायनाड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरीजवळ वीणा जॉर्ज यांच्या कारला अपघात झाला.
Kerala Health Minister Veena George’s vehicle met with a minor accident near Manjeri in Malappuram district. She was travelling to Wayanad. She has suffered minor injuries and is being treated at Manjeri Medical College: State Health Department and Local Police
— ANI (@ANI) July 31, 2024
मुसळधार पावसाचा इशारा
येत्या तीन तासांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. विभागाने केरळमधील पठाणमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. वायनाड, कोझिकोड, कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यातही येत्या तीन तासांत मुसळधार पाऊस पडणार आहे.
बचावकार्य पुन्हा सुरू
वायनाडमध्ये खराब हवामानामुळे मंगळवारी थांबवण्यात आलेले बचावकार्य बुधवारी सकाळी पुन्हा सुरू झाले. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि अग्निशमन दल वायनाड जिल्ह्यातील मुंडक्कई या छोट्या भागात बचाव कार्य करत आहेत. तसेच येथील लोकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.
हेही वाचा :
हमासचा प्रमुख इस्माईल हानिया ठार ; इस्रायलने इराणमध्ये घुसून केली हत्या





