Priyanka Gandhi : हातात संविधान घेत प्रियांका गांधींनी घेतली खासदारकीची शपथ !

Priyanka Gandhi | काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांचा केरळच्या वायनाड लोकसभा पोटनिवडणूकीत विजय झाला. यानंतर आज गुरुवारी त्यांनी खासदारकीची शपथ घेतली आहे. पहिल्याच निवडणुकीत प्रियंका गांधी चार लाखांहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तिचे नाव पुकारले असता त्या हातात संविधानाचे पुस्तक घेऊन आल्या आणि त्यांनी शपथ घेतली.
वायनाडमध्ये प्रियांका गांधींच्या उमेदवारीमुळे देशभराचे लक्ष लागले होते. त्यांच्याविरुद्ध सत्ताधारी डाव्या आघाडीतर्फे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सत्यन मोकेरी आणि भारतीय जनता पक्षाने नव्या हरदास यांना उमेदवारी दिली होती. या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधींना ६.२२ लाख मतांनी विजय मिळाला.
भाकपचे सत्यन मोकेरी २.११ लाख मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर भाजपच्या नव्या हरदास यांना १.०९ लाख मतांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. वायनाडमधील काँग्रेस नेत्यांनी काल निवडणुकीतील विजयाचे प्रमाणपत्र प्रियांका गांधी सुपूर्द केले. या वेळी राहुल गांधी हे देखील उपस्थित होते.
दरम्यान, राहुल गांधी रायबरेलीमधून खासदार आहेत, प्रियंका वायनाडमधून तर सोनिया गांधी राज्यसभेच्या खासदार आहेत. प्रियांका आता भाऊ राहुल गांधी यांच्यासह लोकसभेत केंद्र सरकारला कोंडीत पकडतील, असे मानले जात आहे. संसदेत पोहोचण्यापूर्वीही प्रियंका गांधी मोदी सरकारच्या कारभारावर सातत्याने सरकारला कोंडीत पकडत होत्या.
राहुल गांधी यांच्यापेक्षा जास्त मतांनी प्रियंका यांचा विजय
लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींनी आपली वायनाडची जागा माजी खासदार आणि तिचा भाऊ राहुल गांधी यांच्यापेक्षा जास्त मतांनी 4,10,931 जिंकली आहे. दरम्यान, सोनिया गांधी यांनी 2024 मध्ये लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्या राज्यसभेवर निवडून आल्या. त्याचबरोबर आता राहुल आणि प्रियांका गांधी लोकसभेत दिसणार आहेत.
गांधी कुटुंबातील चौथ्या महिला सदस्य राजकारणात
प्रियांका गांधी या गांधी कुटुंबातील चौथ्या महिला सदस्य आहेत ज्या लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या आधी इंदिरा गांधी, सोनिया गांधी आणि मनेका गांधी लोकसभेच्या खासदार होत्या.
रवींद्र चव्हाण देखील खासदारकीची शपथ घेणार
याशिवाय नांदेडचे नवनिर्वाचित कॉंग्रेस खासदार रवींद्र चव्हाण हे देखील संसद सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकावणारे खासदार वसंत चव्हाण यांचे आजारपणामुळे निधन झाल्याने नांदेडमध्ये पोटनिवडणूक झाली होती. त्यात वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण भाजपचे डॉ. संतुकराव हंबर्डे यांचा १४५७ मतांनी पराभव केला.





