वायनाड : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी अपेक्षेप्रमाणे लोकसभा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय संपादन केला. त्यांनी केरळच्या वायनाड मतदारसंघात ४ लाखांहून अधिक मताधिक्याने बाजी मारली. त्यामुळे खासदार म्हणून प्रियंका यांचा संसदेतील प्रवेश निश्चित झाला. वायनाडमधील मतमोजणी उशीरापर्यंत सुरू होती. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा प्रियंका यांच्या नावावर ६ लाख २२ हजार ३३८ मतं जमा झाली होती. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी आणि डाव्या आघाडीचे उमेदवार सत्यन मोकेरी यांना ४ लाख १० हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने मागे टाकले. मोकेरी यांना २ लाख ११ हजार मतं मिळाली. भाजपच्या उमेदवार नव्या हरिदास १ लाखांपेक्षा अधिक मतं मिळवत तिसऱ्या स्थानी राहिल्या. प्रियंका यांनी त्यांचे बंधू राहुल गांधी यांना मताधिक्याच्या बाबतीत मागे टाकले. काही महिन्यांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत राहुल यांनी वायनाडमधून ३.६४ लाख मताधिक्याने विजय मिळवला. त्यावेळी राहुल यांनी उत्तरप्रदेशातील रायबरेलीमधूनही विजय प्राप्त केला. त्यांनी रायबरेलीला पसंती देत वायनाडची जागा सोडली. त्यामुळे पोटनिवडणुकीला सामोऱ्या गेलेल्या वायनाडमधून प्रियंका मैदानात उतरल्या. उमेदवार म्हणून त्यांनी प्रथमच निवडणूक लढवली.