केळवडे : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील केळवडे गावाच्या हद्दीत, न्यू फुटबॉल ग्राउंड समोर, दि. 15 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृत युवक कराड मलकापूर येथील असून, दुचाकीने पुण्याहून कराडकडे जात असताना ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त युवकाची दुचाकी रस्त्याच्या डिवायडरच्या उजव्या बाजूस पडलेली होती. घटनास्थळी मदतीसाठी कुणीही थांबत नसताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) भोर तालुकाप्रमुख शरद विश्वास जाधव (केळवडे) व सामाजिक कार्यकर्ते अनिकेत रमेश शिळीमकर (कुरुंगावडी) यांनी प्रसंगावधान राखून अपघातस्थळी धाव घेतली आणि महत्त्वाचे मदतकार्य उभारले. घटनेचा तपशील: मृत युवक सुरज दिलखुश सुर्यवंशी (वय 29, रा. जखीनवाडी, ता. कराड, जि. सातारा) हा MH-12-CQ-6607 या क्रमांकाच्या दुचाकीवरून पुणेहून कराडकडे जात होता. न्यू फुटबॉल ग्राउंडजवळील हॉटेल राजस्थानी समोर रात्री सुमारे 11:45 वा.च्या सुमारास अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहन चालक घटनास्थळावर न थांबता पसार झाला. शिवसैनिकांची तातडीची प्रतिक्रिया: घटनेच्या काही वेळातच शरद जाधव आणि अनिकेत शिळीमकर हे घरी परतत असताना रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दुचाकीस्वार त्यांच्या नजरेस पडला. गाड्यांचे ट्राफिक चालू असताना दोघांनी प्रसंगावधान राखून ट्राफिक एका बाजूने वळवले, अपघातस्थळ सुरक्षित केले आणि तत्काळ सिद्धिविनायक हॉस्पिटल, नसरापूर येथे संपर्क साधला. आरोग्यसेवा वेळेत दाखल: शरद जाधव यांनी डॉ. राजेंद्र डिंबळे सर यांच्याशी संपर्क साधून ॲम्बुलन्सची विनंती केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड ॲम्बुलन्स चालक काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाला. NHI आपत्कालीन सेवा गाडी देखील तत्काळ मदतीसाठी आली. मृतावस्थेतील अपघातग्रस्तास रात्री 1.15 वा. सिद्धिविनायक हॉस्पिटल, नसरापूर येथे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. कुटुंबीयांना तातडीने माहिती: मृताच्या खिशातील मोबाईलमधील संपर्क क्रमांकावरून सुर्यवंशी कुटुंबीयांशी तातडीने संपर्क साधण्यात आला व अपघाताची माहिती देण्यात आली. यासोबतच राजगड पोलीस स्टेशन येथे देखील अपघाताची माहिती कळविण्यात आली. आय बी न्यूज संपादक व प्रभात पत्रकार विशाल शिंदे यांनाही घटनेची तात्काळ माहिती देण्यात आली. पोलीस कार्यवाही व गुन्हा नोंद: या प्रकरणी धिरज सुर्यवंशी यांनी फिर्याद दिली असून राजगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 193/2025, BNS कलम 281, 125(a), 125(b), 106(1), आणि मोटार वाहन कायदा कलम 184, 134/177 अंतर्गत अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहवा खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नागरिकांमध्ये कौतुकाची लाट: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) चे पदाधिकारी शरद जाधव व सामाजिक कार्यकर्ते अनिकेत शिळीमकर यांनी दाखवलेली तत्परता व सामाजिक जाणीव ही खरंतर इतरांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या तत्काळ प्रतिसादामुळे मदतीस विलंब झाला नाही, हे विशेष.