Accident News : धक्कादायक ! मॉर्निंग वॉक करणा-या विद्यार्थ्यांना ट्रकची धडक; 4 जणांचा मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी-गडचिरोली महामार्गावर पहाटे 5 वाजताच्या सुमारास भीषण रस्ते अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मॉर्निंग वॉक दरम्यान भरधाव ट्रकने चिरडल्याने हा अपघात झाला. मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींच्या उपचारासाठी सरकारने मदत केली आहे. या अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला आहे.
तनवीर मानकर, टिकू भोयर, भूषण मेश्राम, तुषार मारबाते अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, गडचिरोलीत काटली गावात पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा विद्यार्थ्यांना भरधाव ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात घडला. ही धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार गंभीर जखमी झाले.
जखमींना तातडीने गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आणखी दोन विद्यार्थ्यांनी प्राण गमावले. उर्वरित दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, गंभीर जखमी झालेल्या दोन विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी नागपूरला हेलिकॉप्टरने हलवण्याची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.





